समुद्राचे पाणी निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील


रोजच्यासारखे सीता व नीता या दोघी बहिणींनी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आपला गृहपाठ आटोपला व मावशीजवळ जाऊन बोलू लागल्या.
“मावशी आता आम्हाला साबणाच्या फुग्यांची माहिती सांग बरं.” निता म्हणाली.
“आम्ही लक्षपूर्वक ऐकतो व आमच्या मैत्रिणींनासुद्धा सांगू.” दोघींनीही पुन्हा मावशीला एकसाथ सांगितले.
“शाब्बास! म्हणजे तुम्ही ज्ञानपोट्या नाहीत तर.” मावशी म्हणाली.
“मावशी! ज्ञानपोट्या म्हणजे काय गं?” सीताने विचारले.
“ज्ञानपोट्या म्हणजे आपणास मिळालेल्या ज्ञानाने बेडकाप्रमाणे आपलेच पोट फुगवून ठेवणे. इतरांना काहीच न सांगणे.” मावशीने सांगितले.
“नाही गं मावशी! आम्ही दोघीही आपल्या मैत्रिणींना सारं सांगतो. कारण आई नेहमीच म्हणते, “जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांना सांगावे।” नीता म्हणाली.
“आणि शहाणे करूनी सोडावे। सकळ जन।।.” सीताने पुढील ओळ पूर्ण केली.
“पुन्हा शाब्बास!” मावशी खूश होत म्हणाली, “म्हणजे तुम्ही ज्ञानपोट्या नसून ज्ञानवाट्या आहेत.”
“आता हे ज्ञानवाट्या काय आहे गं मावशी?” नीताने प्रश्न केला व पुढे बोलली,“आम्हाला भांड्यांतील वाट्या माहीत आहेत.”
“वाट्या म्हणजे भांड्यांतील वाट्या नाहीत, तर ज्ञानवाट्या म्हणजे ज्ञान वाटणा­ऱ्या. अशा उदार मनाच्या मुली आहात तुम्ही.” मावशी बोलली.
“आणि मावशी आम्ही आमच्या मैत्रिणींजवळची माहितीसुद्धा त्यांना विचारून घेतो.” सीताने सांगितले.
“छान! म्हणजे तुम्ही ज्ञान देणा­ऱ्या, घेणा­ऱ्या, ज्ञानदेत्याघेत्या पेट्या आहात तर! छान! छान! बंर माझ्या ज्ञानदेत्या, ज्ञानघेत्या मुली आहेत.
“मावशी, आम्ही समुद्र, तर काही पाहिला नाही पण समुद्राचे पाणीही निळेच दिसते म्हणतात. ते खरे आहे का?” नीताने विचारले.
“पण पाण्याला तर रंग नाही ना मावशी. मग समुद्राचे पाणी निळे का दिसते?” सीताने योग्य प्रश्न केला.
“खरे पाहता शुद्ध पाण्याला रंगच नाही. सूर्यप्रकाश जेव्हा पाण्यावर पडतो तेव्हा त्यातील थोडासा प्रकाश पाण्यात शोषला जातो. थोडासा प्रकाश पाण्यावरून परावर्तित होतो. बाकीचा सारा प्रकाश हा पाण्यातून आरपार जातो. त्यामुळे पाण्याला रंगच नाही व त्यात जो रंग मिसळला त्याचा रंग त्याला येतो. पण समुद्राचे पाणी हे निळेच दिसते. त्याचे कारण असे आहे की, निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे आपणास तलावाचे वा कोणत्याही मोठ्या जलाशयाचे तसेच अथांग सागराचे पाणीसुद्धा निळे दिसते; परंतु आपल्या भारताचे नोबेल पारितोषिक विजेते जगप्रसिद्ध व सुप्रख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी प्रकाशकिरण समुद्राच्या पाण्यातून जात असतांना त्यांचेसुद्धा विकिरण होते म्हणून समुद्राचे पाणी निळे दिसते असे प्रतिपादन केले आहे.” मावशीने सांगितले.
“पाण्यात कसे काय विकिरण होते?” मावशी. सीताने प्रश्न केला.
“पाण्यातसुद्धा असंख्य विविध कण असतात. पाण्याचे रेणूही असतात. पाण्यात तरंगणा­ऱ्या विविध कणांमुळे आणि पाण्याच्या रेणूंमुळे प्रकाशाचे विकिरण होते. ते विकिरण वातावरणातील धूलिकणांसारखेच झाल्यास समुद्राचे पाणीही निळे दिसते.” मावशीने उत्तर दिले.
“मावशी तुम्ही पाण्याच्या रंगांबद्दल सांगत होत्या ते सांगा ना.” नीताने म्हटले
“हो तेच सांगते, आता बाळांनो.” मावशी पुढे म्हणाली, “तसेच ब­ऱ्याचदा पाण्यातही विविध रंग दिसतात. प्रकाशाचे विकिरण हे पाण्याच्या रेणूंच्या आकारावर अवलंबून असते. प्रकाशाचे विकिरण हे ज्या रेणूंंवरून होते त्या रेणूंचा आकार जर प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा लहान असेल, तर पाण्यात निळ्या रंगाचा प्रकाश पसरतो; परंतु जर पाण्यातील कण, जलबिंदू व पाण्याचे रेणू एकत्रित झाले व त्यांचा आकार हा प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा मोठा झाला, तर इतर लांब तरंगलांबीचे तांबडा, पिवळा वगैरे इतर किरणसुद्धा विखुरतात. त्यामुळे कधी कधी पाण्यातसुद्धा छानपैकी विविध रंग दिसतात. जर पाण्यातील वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या रेणूंवरून एकाच वेळी वेगवेगळ्या रंगाच्या किरणांचे विकिरण जास्त झाल्यास पाण्यात सुंदरसे मिश्ररंगसुद्धा दिसतात.”
एवढ्यात त्यांची आजी त्यांच्याजवळ येऊन बसली. ती मावशीशी बोलू लागली व त्यांची चर्चा थांबली.

Comments
Add Comment

चिमणीची गोष्ट...

एक होती चिमणी ती एका झाडावर राहायची. तिचा शेजारी होता कावळा. तो होता थोडासा बावळा. काव काव करायचा अन् चिमणीला

आत्महत्या

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ माझ्या लहानपणी मला माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट कायमची मनावर कोरली गेली आहे.

अवगुणांमुळे प्रतिष्ठा जाते

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात गुण आणि अवगुण हे दोन्ही असतात. गुण माणसाला उंचावतात, तर

आकाश निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोघी बहिणी. त्यांना जसा अभ्यासात रस होता तशीच त्यांना वाचनाचीही भारी आवड

खरे सौंदर्य

कथा : रमेश तांबे एक होता राजा. त्याचे राज्य खूप मोठे होते. त्याच्या राज्यातले लोक आनंदी आणि समाधानी होते. राजाने

दृष्टी

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ अ‍ॅलिसा कार्सन (Alyssa Carson), केवळ चोवीस वर्षांची ही मुलगी, जी मंगळ ग्रहावर जाणारी ‘पहिली