सांगली : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्यात एक अनपेक्षित विघ्न आले. लग्न समारंभाची थाटामाटात तयारी सुरू असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांची तब्येत बिघडली. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे सांगितले असले तरी, पूर्ण बरे होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची शक्यता आहे.
दुपारी ३.३० वाजता स्मृती आणि पलाशच्या विवाहाचा मुहूर्त ठरलेला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच लग्नस्थळी सर्व तयारी थांबवण्यात आली. फार्म हाऊसची सजावट काढण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
स्मृती मंधानाचा तिच्या वडिलांवर खूप जीव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत लग्नाचा कोणताही कार्यक्रम करू नये, असा निर्णय तिने घेतला आहे. कुटुंबीयांनीही हा निर्णय मान्य केला आहे. विवाह सोहळा पुढे कधी होणार याबाबत अद्याप तारीख निश्चित नाही.






