Sunday, November 23, 2025

स्मृती–पलाशच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा; संगीत समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती–पलाशच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा; संगीत समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सांगली : भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व चित्रपट निर्माते पलाश मुच्छल यांच्या राजेशाही लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. प्रपोजलपासून ते हळद, मेहेंदी आणि आता झालेल्या धमाल संगीत समारंभापर्यंत प्रत्येक क्षणावर चाहत्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आज (२३ नोव्हेंबर) या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असून, त्याआधी झालेली संगीत नाईट खास चर्चेचा विषय ठरली आहे.

या समारंभात स्मृती आणि पलाशच्या रोमँटिक परफॉर्मन्सने वातावरण आणखी आनंदमय केले. सलमान खानच्या ‘सालाम-ए-इश्क’ चित्रपटातील ‘तेनु लेके मे जावांगा’ या गाण्यावर दोघांनी जबरदस्त डान्स केला. स्मृतीने पलाशच्या गळ्यात हार घालत डान्सला सुरुवात केली आणि त्यानंतर दोघांनी एकत्र केलेल्या सिग्नेचर स्टेपनं उपस्थितांचे मन जिंकले. त्यांचा हा रोमँटिक व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

संगीत समारंभात आणखी एक आकर्षण ठरला तो टीम इंडियाच्या महिला क्रिकेटरांचा ग्रुप डान्स. स्मृतीच्या टीममेट जेमिमा रॉड्रीग्ज, श्रीयंका पाटील, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि यष्टिवादी याचिका भाटिया यांनी ‘तेरा यार हू मै’ या गाण्यावर दिलखुलास परफॉर्मन्स देत कार्यक्रमात रंगत आणली. त्यांचा उत्साही डान्स पाहून उपस्थितांनी त्यांचेही तितकेच कौतुक केले.

पलाश आणि स्मृतीच्या लग्नाला फिल्म आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. प्री-वेडिंग फोटोंनी आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, त्यांच्या भव्य विवाहसोहळ्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Comments
Add Comment