जयपूर : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. यानंतर राज्यात भाजपने अनेक ठिकाणी स्वतःची ताकद वाढवण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या. भाजपच्या हालचाली बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली तसच दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर स्वतःची बाजू मांडली. एवढी धडपड करुनही हाती जास्त काही लागत नसल्याचे बघून शिवसेनेने दबावासाठी नवी खेळी केली आहे.
शिवसेनेच्या राजस्थानमधील नेत्यांनी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जास्त जागांची मागणी केली आहे. आमची मागणी पूर्ण होणार नसल्यास राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार करू; असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
मागच्या वर्षी राजस्थानमध्ये तीन आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना राजस्थानमध्ये मर्यादीत प्रमाणात सक्रीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील स्थानिकच्या सर्व जागा लढवण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या या इशाऱ्यावर भाजपने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.