Saturday, November 22, 2025

मुलांच्या नजरेतून पालक

मुलांच्या नजरेतून पालक

मुलांचं आयुष्य, त्यांचं व्यक्तिमत्त्व आकारात आणण्यात मातृत्व आणि पितृत्व हे फार मोठी भूमिका बजावतं. आईच्या कुशीत असल्यापासून ते मोठं होईपर्यंत तसंच मित्र, शिक्षक यांच्या नजरेत भरणारा हिरो बनेपर्यंत मुलांच्या मनावर उमटणारे अस्तित्वाचे ठसे हे पालकांच्या शब्दांपेक्षाही त्यांच्या वागण्याने अधिक खोलवर रुजत असतात. मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तुमचं त्यांच्याशी वागणं, बोलणं, व्यक्त होणं, प्रतिसाद देणं, वेगवेगळ्या आव्हानांना समर्थपणे सांभाळणं या सगळ्या गोष्टींतून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळत असतो. आपल्याला असं वाटतं की, आपण आदर्श पालक असावं पण आदर्श पालकत्वापेक्षाही आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या अडचणीच्या काळात, त्यांच्या भावनिक आंदोलनात, त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी उभे आहोत हे खरं म्हणजे मुलांना हवं असतं. मुलं त्यांच्या वयाच्या विविध टप्प्यांत आई-वडिलांकडे कोणकोणत्या दृष्टीने पाहतात ते आज आपण माहीत करून घेऊया.

मूल जन्माला आल्यापासून ते दोन वर्षांचे होईपर्यंत मुलांना आईची कूस म्हणजे सुरक्षित जागा वाटते. ज्याप्रमाणे हृदयाचे ठोके हे आपल्या जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात त्याप्रमाणे आईच्या कुशीत मुलांना खूप सुरक्षित वाटतं. रडू आलं की आईजवळ असलं म्हणजे त्यांना छान वाटतं. गर्दीतही ते आपल्या आईचा चेहरा शोधत असतात. त्यांना हवा असतो विश्वास. सुखाचा एक मुलायम स्पर्श आणि त्यामुळेच या प्रेमाचा पाया तयार करण्यासाठी ते या वयामध्ये शिकत असतात.

दोन ते पाच वर्षांचे होईपर्यंत मुलांना आईच्या जगातील केंद्रस्थान बनायला आवडतं. आई “मी बघ काय केलं” हे दाखवण्याची ती पायरी असते. या वयात त्यांना असं वाटतं की, आपली आई सगळे प्रश्न सोडवू शकते. आपला बाबा प्रत्येक गोष्ट फिक्स करू शकतो. मुलांना तुमचं प्रेम आणि मग त्यातून तुम्ही त्यांच्यासाठी धाडसी गोष्टी कशा करता ते पाहायला आवडतं आणि त्यातूनच ते शिकत असतात. ते पाहतात की तुम्ही स्वतःला कसं वागवता. तुमचा स्ट्रेस तुम्ही कसा मॅनेज करता. प्रयत्नपूर्वक कठोर शब्द वापरणं आणि भीती दाखवणे या वयातल्या मुलांबरोबर आपण टाळलं पाहिजे, कारण या वयात तुमची रिअॅक्शन त्यांच्या जगातल्या संवेदनांसाठी खूप महत्त्वाची असते.

पाच ते नवव्या वर्षांपर्यंत आई मुलांसाठी मार्गदर्शक असते. मुलं आई-वडिलांच्या सवयींचं अनुकरण करतात. आई-वडिलांची बोलण्याची पद्धत, त्यांची प्रतिक्रिया देणे याची ते हुबेहूब कॉपी करतात. तुम्ही जेव्हा रागावता तेव्हा कशा पद्धतीने बोलता, तुमच्या हातून चुका झाल्या, तर तुम्ही त्या कशा हाताळता. खरं म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी रोल मॉडेल असता. अनुकरणीय आदर्श असता.

मुलं या वयात प्रॉब्लेम कसे सोडवायचे, परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं, प्रेमाने कसं वागायचं हे शिकतात. ते खरं म्हणजे तुमचंच निरीक्षण करत असतात, म्हणूनच मुलांना क्रिटिसाइज करू नका कारण तुमचे हे शब्दच मुलांना घडवतीलही आणि बिघडवतीलही. दहा ते बाराव्या वर्षांपर्यंत मुलांना आई-वडील म्हणजे एक सुरक्षित बंदर आहे असं वाटतं, जिथे विसावा घ्यावा. आता मुलांचं जग विस्तारत असतं. असं असलं तरी तुमची भावनिक सोबत अद्यापही त्यांच्यासाठी एखाद्या नांगर टाकलेल्या बोटीची भूमिका बजावत असते. ते तुमच्याशी बोलताना या गोष्टींचे निरीक्षण करत असतात की तुम्ही त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकताय की नुसती मान हलवत आहात. मग त्यावरून त्यांना कळतं की त्यांच्या भावना खरंच महत्त्वाच्या आहेत का? जेव्हा ते संकटात सापडतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध असता का हेही ते पाहतात. म्हणूनच रडणं थांबव असं बोलणं आपण पालक या नात्याने थोडं टाळायलाच हवं. मुलांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याऐवजी मनाच्या तळाशी दाबून ठेवायला शिकवणं नकोच पालकांनो.

तेरा ते सोळाव्या वर्षांपर्यंत मुलं ज्याप्रमाणे होकायंत्र योग्य दिशा दाखवते, अगदी तसंच ते आपल्या पालकांकडे पाहत असतात. आता या वयातील मुलांचं जग स्वातंत्र्याकडे ओढा घ्यायला लागतं. स्वातंत्र्याकडे झुकताना, त्याच्या शोधात असले तरी मुलं अजूनही आपल्या पालकांकडे अतिशय सजग होऊन पाहत असतात. ते जरी तुमच्यापासून अंतर ठेवत असले तरी भांडण झाल्यानंतर तुम्ही ती कशी सांभाळता? तुमच्या बाउंड्रीस तुम्ही कशा सांभाळता? लोकांना कसं माफ करता? हे ते पाहत असतात. या वयात मुलांना स्वमूल्य अर्थात स्वतःची किंमत म्हणजे सेल्फ वर्थ समजून घ्यायला आवडतं. आपल्याला आदर मिळतोय का? कुठे मिळतोय? कसा मिळतोय? याबद्दल ते सजग राहायला लागतात. निराशा आली की आपले पालक ती कसे सांभाळतात तेही मुलं पाहतात.

पालकांनो तेरा ते सोळा वयातील मुलांवर सतत टीका करणे किंवा त्यांनी मिटून जावं असं बोलणं आपण खरोखरच टाळायलाच हवं. टीनएजर्सना तुमच्याशी कनेक्ट व्हायला, जोडल्या जायला आवडत असतं. ते दाखवत नाहीत पण मनापासून मात्र तसेच वाटत असतं.

१७ ते २० या वयात मुलं गेली तरी त्यांच्यावरती तुमचा प्रभाव असतो. आता त्याचं स्वतःचं अस्तित्व तयार व्हायला लागलेलं असतं तरीही त्यांच्यावर तुमचा प्रभाव अद्याप रेंगाळत असतोच. त्यांचा स्वीकार केला जातो की, त्यांच्याबद्दल काही मत तयार केलं जातं त्यानुसार मुलं तुम्हाला प्रतिक्रिया देत असतात. मुलं या वयामध्ये हे निरीक्षण करतात की तुमचं प्रेम जर-तर याच्यावर ठरतंय का? तुम्ही त्यांच्याविषयी आदर दाखवत आहे का? त्यांच्यावर दडपण आणता की त्यांचा आब राखता? या वयातील मुलांच्या प्रत्येक निवडीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका पालकांनो. त्यांना तुमचं मार्गदर्शन हवं असतं मात्र तुम्ही सावलीप्रमाणे त्यांचा पाठलाग करू नका.

म्हणूनच पालकांनो हा विचार करूया की मुलाने माझ्याशी जसं बोलावं असं मला वाटतं तसं मी माझ्या मुलाशी बोलतोय का? मी त्याला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी वेळ, स्पेस देतोय का? मी जरी त्याच्या भावना समजू शकलो नाही, तरी निदान तशी संधी तयार करतोय का? कोणतंही कारण नसताना, खूप काही ग्रेट घडलेलं नसतानाही मला तुझा अभिमान वाटतो असं मी शेवटचं कधी म्हटलं होतं बरं? खरं सांगू का पालकांनो आदर्श पालक बनवण्याच्या नादात आपण मुलांशी मायेचं असलेलं नातं गमावून बसायला नको. त्यांना आदर, प्रेम, सुरक्षितता, भावना व्यक्त करण्याची संधी आणि मायेची उब देतानाच शिस्त, नियम, आदरयुक्त धाक यांची जोड देऊया म्हणजे मुलांसाठी घरातच आदर्श निर्माण होईल.

Comments
Add Comment