Monday, January 26, 2026

मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर

मुथुस्वामीचे पहिले शतक आणि जॅन्सनची दमदार खेळी; दक्षिण आफ्रिकेने उभारला ४८९ धावांचा डोंगर

गुवाहाटी : गुवाहाटी येथे सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने दुसऱ्या दिवशी प्रभावी फलंदाजी करत ४८९ धावांची मोठी मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी बजावत भारतीय गोलंदाजीचा कस लावला. सेनुरन मुथुस्वामीने कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक, तर मार्को जॅन्सनने ९३ धावांची झळाळती खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या मिळवून दिली. भारताने दिवसाखेरीस बिनबाद नऊ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी कसोटीत दुसऱ्या दिवशी सहा बाद २४७ या धावसंख्येवरुन खेळ पुढे सुरू केला. मुथुस्वामी आणि काइल व्हेरेन यांच्या संयमी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिले सत्र गाजवले. भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करून दडपण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजांनी बचावात्मक शैलीत धावा करत भागीदारी ५० धावांच्या पार नेली.

जडेजाने व्हेरेनला बाद केले. व्हेरेन ४५ धावा करून परतला. पण त्यापूर्वी त्याने मुथुस्वामीसोबत ८८ धावांची भागीदारी केली. पुढच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीने भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवला. जॅन्सन आणि मुथुस्वामीने जडेजा तसेच वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत वेगाने धावा केल्या.

मुथुस्वामीने कुलदीप यादवची गोलंदाजी फोडून काढली. चौकार–षटकार लगावत १०९ धावांची मजल मारली. जॅन्सनदेखील शतकाकडे वाटचाल करत होता, परंतु ९३ धावांवर तो बाद झाला. शेवटच्या चार जोड्यांनी धावसंख्येत आणखी २४३ धावांची भर घातली.दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८९ धावांवर आटोपला.

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाने संयमाने सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने जॅन्सनच्या चेंडूवर चौकार मारत भारतीय डावाची सुरुवात केली. दिवसअखेर जयस्वाल आणि केएल राहुल खेळत होते. भारताने बिनबाद नऊ धाला केल्या.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच डावात भक्कम धावसंख्या उभी केल्याने सामना त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. भारतीय संघावर आता मोठी धावसंख्या ओलांडण्याचे आव्हान आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजीची कसोटी लागणार आहे. भारत अद्याप ३८० धावांनी पिछाडीवर आहे.

Comments
Add Comment