मानसिक आरोग्यावर आधारीत अभ्यासक्रम लावणारा मुंबई आयआयटी पहिलाच
मुंबई : आयआयटी मुंबईने आपल्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य आणि कल्याण हा अनिवार्य अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पास–नो पास (PNP) प्रकारात असेल. म्हणजेच यासाठी कोणतीही परीक्षा किंवा गुणांकन नसून विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात ठरावीक संख्या मानसिक आरोग्य कार्यशाळांना उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
आयआयटी मुंबई असा अभ्यासक्रम राबवणारे कदाचित पहिले आयआयटी ठरेल, असे संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदार यांनी सांगितले. “मानसिक आरोग्याशी संबंधित विविध विषयांवरील कार्यशाळांच्या माध्यमातून हा कोर्स घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना सोयीने सहभागी होता यावे, म्हणून शैक्षणिक वर्षभर विविध वेळा या कार्यशाळा आयोजित केल्या जातील. प्रत्येक सत्रात किमान चार कार्यशाळांना उपस्थिती अनिवार्य असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. केदार हे उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयआयटी मुंबईत २२-२३ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘नॅशनल वेलबिंग कॉन्क्लेव्ह २०२५’ची माहिती देत होते. या दोनaदिवसीय परिषदेत देशातील ७९ उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थी कल्याणासाठी होणाऱ्या उपक्रमांवर कार्यशाळा, परिसंवाद आणि पॅनल चर्चेद्वारे विचारमंथन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आयआयटी मुंबईने १९९८ च्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ‘फ्लॉरिशिंग हब’ नावाची विशेष सुविधा विकसित केली आहे. येथे प्रशिक्षित तज्ज्ञ मानसिक आरोग्य व जीवनशैलीविषयक उपक्रम राबवत आहेत.
हा नवीन मानसिक आरोग्य अभ्यासक्रम ऑगस्ट २०२५ पासून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. विद्यार्थी कल्याण केंद्राचे उपाध्यक्ष आणि फ्लॉरिशिंग हबचे प्रभारी प्रा. दीपक मरला यांनी सांगितले, “पहिल्या सत्रात जीवन कौशल्ये, निरोगी सवयी, व्यसनविरोधी जागरूकता, तणाव व्यवस्थापन अशा विषयांवरील कार्यशाळा घेतल्या जातील. दुसऱ्या सत्रात वैयक्तिक प्रगती आणि जीवन नियोजनावर भर असेल.”
विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा ताण शैक्षणिक अभ्यासापेक्षा आयआयटी नंतरच्या करिअरविषयी असतो — इंटर्नशिप, प्लेसमेंट, उच्च शिक्षणाच्या संधी यांचा दबाव त्यांना अधिक जाणवतो.” फ्लॉरिशिंग हबअंतर्गत शिक्षक, विद्यार्थी मार्गदर्शक यांना प्रशिक्षण देणे तसेच भविष्यात माजी विद्यार्थ्यांमार्फतही मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणातील मूल्यांकनपद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न आयआयटी मुंबईकडून सुरू आहेत. पारंपरिक पद्धतीऐवजी अधिक क्रियाशील आणि सहभागी शिक्षणपद्धतीवर भर देण्यासाठी १० वर्गखोल्यांचे नव्या तंत्रसुविधांसह आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तसेच शिक्षकांसाठी अध्यापन पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.






