मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आधीच उपकर्णधार श्रेयस अय्यर २-३ महिन्यांसाठी मैदानाबाहेर आहे. आता संघाचा कर्णधार शुभमन गिलही ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेतून बाहेर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीत गिलच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुढील काही दिवस विश्रांतीची गरज भासणार आहे.
दुखापतीनंतरही शुभमन गिल भारतीय संघासोबत कोलकाता ते गुवाहाटी अशा प्रवासात सहभागी झाला. येथे दुसरी कसोटी सामना सुरू आहे. शुभमन गिलला अधिक काळ आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अंदाज आहे की, गिल ९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो. पुढील आठवड्यात त्याची पुन्हा तपासणी होणार आहे, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दुर्दैवाने शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. गुवाहाटीमध्ये निवड समितीची बैठक होणार असून केएल राहुल, अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांच्या नावांवरही चर्चा होऊ शकते.”
ऋषभ पंत सध्या एकदिवसीय संघाचा नियमित भाग नसला, तरी संघ व्यवस्थापन त्याला या फॉरमॅटमध्ये पुन्हा संधी देण्याचा विचार करू शकतो. संघातील उजव्या हाताच्या फलंदाजांची संख्या जास्त असल्याने डावखुऱ्या फलंदाजाला संधी देण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल बाहेर पडल्याने यशस्वी जयस्वाल रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो. तर श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकासाठी ऋषभ पंत किंवा तिलक वर्मा हे पर्याय विचारात घेतले जाऊ शकतात.






