नकली श्रीकृष्ण ‘पौड्रक’

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


भारताच्या पौराणिक कथेत स्वतःलाच देव मानण्याचा दावा करणाऱ्या काही व्यक्तिरेखा आहेत, जसे हिरण्यकश्यपूने स्वतःला देव मानून इतरांनाही देवाऐवजी आता यापुढे माझेच पूजन करा अशी आज्ञा केली होती. त्याच्याप्रमाणेच स्वतःलाच साक्षात भगवान श्रीकृष्णच मानून प्रत्यक्ष श्रीकृष्णालाच आव्हान देणारी पुराणातील व्यक्तिरेखा म्हणजे पौड्रक.


पौंड्रक हा पुंड्र देशाचा राजा होता. (तज्ज्ञांच्या मते पुंड्र देश म्हणजे बंगाल, बिहार व आसाम यांच्या सीमेवरील देश असावेत.) पौड्रकाच्या वडिलांचे नांव वसुदेव होते. म्हणून पौड्रक स्वतःला वासुदेव म्हणून घेत असे. त्याच्याकडे भरपूर सैन्य व काशीराजाचे राजकीय पाठबळ व अनेक स्तुतिपाठक होते. त्यामुळे तो स्वतःला श्रीकृष्ण समजत असे. इतकेच नव्हे तर तो मीच पृथ्वीवरील खरा श्रीकृष्ण आहे व द्वारकेतील श्रीकृष्ण हे केवळ नक्कल करणारे आहेत असे म्हणत असे. या भ्रमीत कल्पनेने त्याच्या मनावर इतका ताबा मिळवला की पौड्रक श्रीकृष्णप्रमाणेच वेशभूषा, शंखचक्र, धनुष्यबाण, तलवार, बनावट कौस्तुभ मणी, पितांबर, सुगंधी चंदन आदींचा वापर करू लागला.


स्वतःच्या या भ्रमीत कल्पनेला चिथावणी देणारे त्याचे सहकारी त्याला अधिक प्रोत्साहित करत असत, त्यामुळे या भ्रमीत कल्पनेने तो एवढा शेफारला की त्याने आपला दूत द्वारकेला पाठवून द्वारकेला भर सभेत “मीच एक मात्र वसुदेव आहे व दुसरा कोणीही नाही. प्राण्यावर कृपा करण्यासाठी मीच अवतार धारण केला आहे, तू आपले वसुदेव असे खोटेच नाव घेतले आहेस ते आता टाकून दे. तू मूर्खाप्रमाणे माझी चिन्हे धारण केली आहेस, ती टाकून मला शरण ये. अन्यथा माझ्याशी युद्ध कर, असा अहंकारयुक्त निरोप पाठविला.


मंदबुद्धी प्रौड्रकाच्या दूताची ही बडबड ऐकून सभेतील सर्वजण जोरजोराने हसू लागले. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने त्याच दूताकरवी “आपल्या राजाला सांग की, मी माझी चक्र इत्यादी चिन्हे तुला लवकरच परत करेन, असा निरोप पाठविला. निरोपा पाठोपाठच भगवान श्रीकृष्णाने गरुडावर स्वार होऊन पौंड्रकावर चढाई केली. पौंड्रक दोन अक्षौहिणी सैन्य घेऊन युद्धाला आला. काशीचा राजा पौंड्रकचा मित्र असल्याने तो सुद्धा तीन अक्षौहिणी सैन्य घेऊन त्याच्या मदतीला आला.


कृष्णाप्रमाणेच वेशभूषा असलेला पौंड्रक पितांबर नेसून रथावर अरूढ होऊन आला. त्याने रथाच्या ध्वजावर गरुड चिन्ह सुद्धा लावून ठेवले होते. मस्तकावर मौल्यवान मुकुट होता व कानामध्ये मखराकृती कुंडली झगझगत होती. आपल्याप्रमाणेच ही कृत्रिम वेशभूषा पाहून श्रीकृष्णाला हसू आले.


युद्धाला तोंड फुटले. पौंड्रक व काशी राजाने कृष्णावर त्रिशूल, गदा, तलवारी आदी शास्त्रास्त्रांचा मारा केला. श्रीकृष्णाने तो सर्व मारा निष्प्रभ केला. श्रीकृष्णाने सुद्धा गदा तलवार चक्र आणि बाण अशा शस्त्रांनी पौंड्रक व काशीराजाचे हत्ती, घोडे आणि पायदळ अशा चतुरंगसेनेला उद्ध्वस्त केले. भगवान श्रीकृष्ण पौंड्रकाला म्हणाले,


“पौंड्रका तू दूताद्वारे मला माझी जी चिन्हे सोडून द्यावयास सांगितली होती ती मी आता तुझ्यावर सोडत आहे.” असे म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र पौंड्रकावर सोडून त्याचा शिरच्छेद केला. त्याचप्रमाणे काशी राजाचाही बाणांनी शिरच्छेद केला. काशीराजाचे मस्तक काशीनगरात राजमहालासमोर जाऊन पडले.


काशी राजाचा सुदक्षिण नावाचा एक पुत्र होता. पित्याचे मस्तक पाहून तो अत्यंत शोकाकुल व संतप्त झाला. पित्याचा वध करणाऱ्याला मारूनच आपण पित्याच्या ऋणातून मुक्त होऊ अशी त्याने प्रतिज्ञा केली व एकाग्रतेने भगवान शंकराची आराधना करू लागला. त्याच्या आराधनाने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला वर मागण्यास सांगितले. सुदक्षिणानी आपल्या पित्याचा वध करणाऱ्याला मारण्याचा उपाय सांगा, असा वर मागितला. त्यावर भगवान म्हणाले तू ब्राह्मणासह यज्ञ देवता ऋत्विज स्वरूप दक्षिणाग्नीची अभिचारीक विधीने आराधना कर यामुळे तो अग्नी प्रमथगणासह प्रकट होईल व तू जर ब्राह्मणाचे भक्त नसणाऱ्या वर त्याचा प्रयोग करशील तर तुझा संकल्प सिद्धीला जाईल असा आशीर्वाद दिला.


सुदक्षिणानी त्याप्रमाणे नियमपूर्वक अनुष्ठान केले. अनुष्ठान पूर्ण होताच यज्ञकुंडातून ज्याचे केस व दाढी-मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल असून डोळ्यांतून ज्वाला बाहेर पडत आहेत व हातात पेटता त्रिशूल फिरवीत असलेली अतिशय भीषण अग्निरूप कृत्य प्रकट झाली व ती आग द्वारकेला जाळीत संपूर्ण नगरात फिरू लागली. ते पाहून भयभित झालेल्या जनतेने भगवंताकडे धाव घेतली. भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राच्या साह्याने त्या कृत्याला निष्प्रभ करून परतून लावले. तेव्हा तिथून परत काशीला येऊन तिने आचार्यसह सुदक्षिणालाच जाळून भस्म केले. अशाप्रकारे त्याचा नाश झाला.


केवळ बाह्य रूपात देवत्वाची चिन्हे धारण केल्याने अंगी देवत्व येत नाही तसेच अहंकाराचा नाशच होतो. हीच शिकवण भागवतातील या भगवान श्रीकृष्ण आणि पौंड्रक यांच्या कथेतून मिळते.

Comments
Add Comment

मुलांच्या नजरेतून पालक

मुलांचं आयुष्य, त्यांचं व्यक्तिमत्त्व आकारात आणण्यात मातृत्व आणि पितृत्व हे फार मोठी भूमिका बजावतं. आईच्या

ये मिलन हमने देखा यहीं पर...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे पुनर्जन्म हा विषय भारतीय समाजमनाला ओळखीचाही आहे आणि प्रियही! पूर्वी या विषयावर

मेहरनगड : सांस्कृतिक इतिहासाची ओळख

विशेष : सीमा पवार संपूर्ण राजस्थानमधील सर्वात प्रभावी आणि मोठ्या किल्ल्यांपैकी एक मेहरनगड आहे. किल्ल्याच्या आत

आयुष्याचं सोनं की माती... हे तुझ्याच हाती!

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे आपल्या आयुष्याचं सोनं करायचं की माती करायची हे आपल्याच हातात असतं. प्रत्येकाने

जात

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड “मालू, फडक्यांचा नकार आला गं!” अप्पांचा आवाज व्यथित होता. “का हो अप्पा? जाताना तर

मैत्रीण

जीवनगंध : पूनम राणे रविवारचा दिवस होता. शाळेला सुट्टी होती. मीनल आणि तिची बहीण शीतल संध्याकाळी पाचच्या दरम्यान