लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
मानवी जीवनात गुण आणि अवगुण हे दोन्ही असतात. गुण माणसाला उंचावतात, तर अवगुण माणसाला खाली खेचतात. प्रतिष्ठा मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे परिश्रम करावे लागतात; परंतु ती गमावण्यासाठी क्षणभराचा अवगुणही पुरेसा ठरतो. म्हणूनच म्हणतात “गुणांनी मान वाढतो आणि अवगुणांनी मान घसरतो.”
अवगुणांचे स्वरूप अवगुणांचे रूप अनेक असते राग, मत्सर, खोटे बोलणे, आळस, वाईट सवयी, पैशाचा लोभ, गैरवर्तन, उद्धटपणा इत्यादी. हे दिसायला लहान वाटले तरी हळूहळू ते स्वभावात पसरतात व माणसाच्या विश्वासार्हतेवर परिणाम करतात.
अवगुणांचा परिणाम अवगुणांमुळे माणूस आपली चांगली प्रतिमा गमावतो. मित्र दूर जातात, कुटुंबाचा विश्वास कमी होतो, समाजात मान कमी होतो, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा घटते. एखादा शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी किंवा पालक कोणताही असो; अवगुण दिसू लागले की लोकांचा आदर कमी होतो. चांगलं वर्तन, प्रामाणिकपणा आणि संयम नसला की माणसाच्या चांगल्या कामाचंही मूल्य उरत नाही.
मुलांसाठी संदेश- प्रिय मुलांनो, अवगुण हे आपणास कधीच उपयोगी ठरत नाहीत. उलट ते तुमचा अभ्यास, मैत्री, घरातील वातावरण आणि तुमचा आत्मविश्वास यांना हानी पोहोचवतात. रागावर नियंत्रण ठेवा, खोटे बोलू नका, इतरांचा हेवा करू नका, मोबाइल, खेळ, वाईट सवयी यांपासून संयम ठेवा. गुण जसे की अभ्यासाची आवड, वेळेचे नियोजन, नम्रपणा, प्रामाणिकपणा, स्वच्छता आणि परिश्रम हे तुमची ओळख उज्ज्वल करतात.
मोठ्यांसाठी संदेश मोठ्यांनीही आपले वर्तन, बोलणे आणि निर्णय याबाबत सजग असणे आवश्यक आहे. समाजात, कार्यालयात, कुटुंबात आपण आदर्श दाखवतो. जर मोठ्यांनी अवगुण स्वीकारले, तर मुलांवर त्याचा चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे प्रामाणिकपणा, संयम, जबाबदारी आणि नीतीमत्ता हे मूल्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे.
गुणांचा स्वीकार प्रतिष्ठेकडे जाणारा मार्ग एखाद्या सुगंधी फुलाप्रमाणे गुण माणसाला सुगंध देतात. सत्य, सहकार्य, शिस्त, नम्रता, मदतभाव, संयम, मेहनत हे गुण जोपासल्यास माणुसकीही वाढते आणि प्रतिष्ठाही. अवगुण क्षणिक सुख देतात, पण दीर्घकाळ नुकसान करतात. गुण मात्र कष्टाने मिळतात, पण आयुष्यभर माणसाची ओळख उजळून ठेवतात. म्हणूनच आपण म्हणू शकतो “गुणांनी गौरव मिळतो आणि अवगुणांनी प्रतिष्ठा घसरते. गुणांचा मार्ग अवघड आहे, पण यश व मान याच मार्गावर आहेत.” सकळ अवगुणांमधे अवगुण। आपले अवगुण वाटती गुण। मोठे पाप करंटपण । चुकेना की ॥ श्रीमद दासबोध विद्यार्थीदशेतच सद्गुणांची आराधना करायची असते. सज्जनतेची व सद्गुणांची आवड निर्माण करायची असते. प्रत्येकाकडे चांगले गुण असतात. ते जोपासता आले पाहिजेत. त्याच्याद्वारे समाजातील व समाजाच्या हिताचे कार्य करणे आपले कर्तव्य आहे. भगवान श्रीकृष्णाने एकदा एक यज्ञ केला. त्याने युधिष्ठिराला सांगितले, “आपल्याला या यज्ञात एक नरबळी द्यायचा आहे.. तेव्हा तू गावातून दुष्ट मनुष्य शोधून आण.” युधिष्ठिराने सर्व गाव फिरून पाहिले. त्याला कुठेही दुष्ट मनुष्य आढळला नाही. शेवटी तो कृष्णाला म्हणाला “ भगवंता, मी आरशात पाहिले आणि मला एक दुष्ट माणूस सापडला. कृष्ण म्हणाला “ठीक आहे” दुसऱ्या दिवशी कृष्णाने दुर्योधनाला बोलावले आणि सांगितले, “दुर्योधन, तूही या गावात फेरफटका मार आणि मला सर्वात सज्जन माणूस शोधून आण.” दुर्योधनाने गाव फिरून पाहिले; परंतु त्याला एकही सज्जन मनुष्य दिसला नाही. शेवटी तो कृष्णाला म्हणाला, “कृष्णा, या गावात मला एकही चांगला मनुष्य सापडला नाही. सर्वांत काही ना काही दोष आहेत.मीही आरशात पाहिले आणि मला एका सज्जन माणसाची गाठ पडली. माझ्यासारखा चांगला माणूस या गावात कुणीच नाही!” युधिष्ठीर व दुर्योधन यांच्या विचारसरणीत जमीनअस्मानाचा फरक होता. युधिष्ठिराने सर्वांत गुण पाहिले, आणि स्वतःला दोषी समजले.दुर्योधनाने सर्वांत दोष पाहिले, आणि स्वतःला निर्दोष समजले. जशी दृष्टी तशी सृष्टी. माताशारदादेवी म्हणत ‘दुसऱ्याचे दोष पाहण्यापेक्षा माणसाने स्वतःचे दोष पाहावेत.’ गुण नसले की, अवगुण वाढतात. चांगले गुण जोपासले, तर समाजात मान वाढतो. अवगुणांमुळे प्रतिष्ठा जाते. आपण आपल्या चुका समजून घेतल्या पाहिजेत. त्या स्वीकारून त्यात सुधारणा केली. पाहिजे. सद्गुणांनी नटलेले जीवनच समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देते. म्हणूनच आपल्या अवगुणांवर नियंत्रण ठेवा.






