एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी येथे शनिवारी दुपारी एक मजली गाळ्यामध्ये अचानक वायूगळती सुरू झाली आणि त्यात तिघांना श्वास गुदमरल्यामुळे त्रास होऊ लागला. तिघांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी ५ वाजता ही घटना घडली. रासायनिक गळती सुरू झाल्यामुळे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रासायनिक गळतीचा शोध सुरु असून कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफ दलालाही सतर्क ठेवण्यात आले आहे. या दुर्घटनेत तीन जणांना वायुगळतीमुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने होली स्पिरिट रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातून मिळालेली माहितीनुसार अहमद हुसेन (२०) याला रुग्णालयात आणल्यावर मृत घोषित करण्यात आले, तर नौशाद अन्सारी (२८) आणि सबा शेख (१७) या दोघांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी अग्निशमन दल पुढील तपास करीत असून शोधकार्य सुरू आहे. रासायनिक गळतीचा स्रोत आणि प्रकार शोधण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.






