Sunday, November 23, 2025

कर्नाटक काँग्रेसमध्ये पडले दोन गट, ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांकडून आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनरची ऑफर ?

कर्नाटक काँग्रेसमध्ये पडले दोन गट, ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांकडून आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनरची ऑफर ?
बंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार या दोघांच्या नेतृत्वात कर्नाटक काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. प्रत्येक गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रतिस्पर्धी गटाच्या आमदारांना ५० कोटी रुपयांसह फ्लॅट आणि फॉर्च्युनर गाडीची ऑफर देत आहे; असा आरोप भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चालवाडी नारायणस्वामी यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यावर मंत्रिपद मिळवून देण्यासाठी २०० कोटींची मागणी केल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी; अशीही मागणी चालवाडी नारायणस्वामी यांनी केली आहे. नारायणस्वामी यांचे आरोप अशा वेळी आले आहेत, जेव्हा माध्यमांमध्ये कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाची चर्चा जोर धरत आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने अलिकडेच अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धारमैया आणि डी.के. शिवकुमार यांच्यात सत्ता वाटपाचा करार झाला होता. त्यानुसार अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे कर्नाटकमध्ये आता सत्ता बदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. काही काँग्रेस नेते या संभाव्य बदलाला 'नोव्हेंबर क्रांती' असेही म्हणत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनीही कर्नाटकच्या राजकारणावर भाष्य केले आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत राज्यात 'अविश्वसनीय घटनाक्रम' पाहायला मिळतील, असे भाकीत त्यांनी केले आहे. राजकारणात कोण कधी काय निर्णय घेईल हे सांगणे अशक्य आहे आणि राज्यात सध्या अशीच 'क्रांती' होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने मात्र भाजपच्या नेत्यांचे आरोप फेटाळले आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >