दुर्मीळ परदेशी पाहुण्याच्या आगमनाने पक्षीप्रेमी आनंदित
प्रशांत सिनकर ठाणे : हिवाळ्याच्या आगमनासोबतच बोईसरला एक दुर्मीळ परदेशी पाहुणा लाभला आहे. श्रीकृष्ण मंदिर तलावात सध्या आकर्षक व दुर्मिळ काळ्या मानेची टिबुकली (ब्लॅक नेक ग्रेब) दिसत असल्याने पक्षीनिरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही टिबुकली साधारणपणे युरोप, आशिया, पूर्व व दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि दक्षिण/प. अमेरिका या भागांत वास्तव्य करते. लांब पल्ल्याच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेला हा जलपक्षी हिवाळ्यात उत्तर भारत, पाकिस्तान, मध्य अमेरिका आणि आफ्रिका येथे दाखल होतो. युरोप, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये जून ते जुलै या कालावधीत या पक्ष्याची वीण होते.
पाण्यावर तरंगणारे, गवताचे कपासारखे घरटे हा पक्षी कुशलतेने बांधतो. त्यात साधारण ३ ते ४ अंडी घातली जातात व सुमारे २१ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. जन्मानंतर अवघ्या दहा दिवसांत पिल्ले तलावभर सहज पोहू लागतात. नर आणि मादी या दोघेही पिल्लांची जबाबदारी वाटून घेतात हा या प्रजातीचा विशेष गुणधर्म असल्याची माहिती पक्षी अभ्यासक विरेंद्र घरत यांनी दिली. काळ्या मानेची टिबुकली हा आकाराने टिबुकली (लिटील ग्रेब)पेक्षा थोडा मोठा असतो. त्याची लांबी २५–२८ सें.मी., वजन २५०–४५० ग्रॅम, पंखांची लांबी ५०–६० सें.मी. तर उड्डाण क्षमता तब्बल ३ हजार किमी पर्यंतचे अंतर कापू शकतो. याचा रंग काळा–पांढरा, मान पूर्ण काळी, पोट पांढरे, पंखांवर ठिपक्यांची छटा आणि सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे भडक लाल डोळे. चोच किंचित वर वळलेली असते. वीण काळात डोके व मानेचा रंग अधिक गडद काळसर–तपकिरी होत असल्याने याचे सौंदर्य आणखी खुलते.
गवताने व्यापलेल्या शांत तलावात राहणे हा या पक्ष्याचा अत्यंत आवडता स्वभाव. पाण्यात सतत डुबक्या मारत, लहान मासे, शंख–शिंपले, बेडूक, किडे–किटक यावर तो भक्षण करतो. तलावाच्या पृष्ठभागावर त्याचे वेगवान पोहणे आणि अचानक मारलेल्या सलग डुबक्यांची मालिका पाहणे ही निसर्गप्रेमींसाठी एक वेगळीच मेजवानी ठरते. बोइसरमध्ये सध्या दिवसभर कॅमेरे व दुर्बिणी घेऊन फोटोग्राफर्स तलावाच्या काठावर तळ ठोकून बसलेले दिसत आहेत.
''विशेष म्हणजे, या पक्ष्याचे महाराष्ट्रात दर्शन यापूर्वी २०१६–१७ मध्ये मुंबईतील भांडुप मिठागरात झाले होते. जवळपास आठ वर्षांनंतर तो पुन्हा राज्यात दिसल्याने यंदाच्या हिवाळ्यातील पक्षीउद्येशीय नोंदींमध्ये या नोंदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.'' असे पक्षी अभ्यासक, विरेंद्र घरत सांगतात.






