Saturday, November 22, 2025

नटवर्य शंकर घाणेकर

नटवर्य शंकर घाणेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर

कलेवर असलेले प्रेम आणि त्या कलाकाराची ताकद काय असते पाहा. ज्या ज्येष्ठ रंगकर्मी शंकर घाणेकर यांनी मुंबईमध्ये सांगितलं होतं, माझं आयुष्य रंगभूमीसाठी आहे आणि माझा मृत्यूदेखील रंगभूमीवरच झाला पाहिजे. माझा मृत्यू माझ्या गावामध्येच झाला पाहिजे. ईश्वराची इच्छा कशी असते पाहा, त्यांचा मृत्यू सडये-पिंरदवणे या त्यांच्या गावी त्यांचा नाट्यप्रयोग सुरू असताना झाला. शेवटचा प्रसंग असा होता की, प्रकाश नलावडे यांच्या मांडीवर त्यांचा मृत्यू होतो असं स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं होतं. नंतर तीन मिनिटांनी कळलं की, ती ॲक्शन नव्हती तर परमेश्वरानं त्याच सीनमध्ये त्यांना वर बोलावून घेतलेलं होतं. एवढ्या ताकतीचे, स्वतःची इच्छा कलेसाठी पूर्ण करून घेणारे कलाकार या कोकणाने महाराष्ट्राला दिले.

कोकणाला नाटकाचे प्रचंड वेड. कोकणातील गावच्या उत्सवात नाटक रंगल्याशिवाय उत्सवाची सांगता होत नाही. आजकाल कलाकार वातानुकूलित नाट्यगृहातच शक्यतो नाटकाचे प्रयोग करतात. मात्र पूर्वी ठीकठिकाणी झापांची नाट्यगृहे आणि त्यात नामवंत कलाकारांनी समरसून केलेले नाट्यप्रयोग आजही अनेकांच्या स्मरणात आहेत असाच एक कोकणातील नामवंत कलाकार कलेच्या ओढीने घरदार सोडून बाहेर पडला. ज्याने आपल्या अभिनयाने रसिकांची मने रिझवली तो कलाकार म्हणजे नटवर्य शंकर घाणेकर. रत्नागिरी तालुक्यातील सडये-पिंरदवणे या गावी १० फेब्रुवारी १९२६ रोजी घाणेकरांचा जन्म झाला. गावातल्या शाळेत चार इयत्ता झाल्या. या दरम्यान मातोश्रींचे निधन झाले. वडिलांनी चिरंजीवाना शाळेतून बाहेर काढले आणि गावातील भिक्षुकाकडे शिकायला पाठवले. थोडेफार म्हणून झाले रुद्र, पवमान, पुरुषसूक्त आदी, लग्न मंजीपर्यंतचे. विविध शिकले पण भिक्षुकीत जीवन घालवायचे मनाची तयारी नव्हती. त्यातच ठिणगी पडली. वडिलांशी भांडण झाले आणि स्वारी घरदार सोडून बाहेर पडली.

एक नातेवाईक पालशेतला होते. त्यांच्याकडे आणि तिथून चिपळूणला आले. चिपळूणला त्यावेळी बाजारात फाटक यांची खानावळ होती. वाढपी ते म्हणून कामाला लागले. कामाला चोख, हजरजबाबी, मिश्कील येणाऱ्या ग्राहकांशी बोलून ते खूश करायचे. मालक फाटक यांची मर्जी बसली. त्यांचे खानावळीतील अनेक किस्से जुनी मंडळी रंगवून सांगायची. मनात नाटकाची ओढ होती आणि त्यावेळी गुहागरला प्रतिभा संगीत नाटक कंपनी आली होती. शंकर घाणेकर वाढपी पदावरून निवृत्ती घेऊन गुहागर येथे नाटक मंडळीत सामील झाले. प्रतिभा नाटक कंपनीचे मालक होते बापूराव आठवले. त्यांनी दोन वेळेच्या जेवणावर काम करावे लागेल असे सांगितले आणि ते घाणेकरांनी मान्य केले. त्यांच्या मनात रंगमंचावर आपण काम करून रसिकांचे मनोरंजन करतोय अशी स्वप्न होती. प्रत्यक्षात त्यांना काम मिळाले गावात जाहिरातीचा गाडा घेऊन जायचे. खुर्च्या लावायच्या, कर्णा घेऊन ओरडत गावातून ओरडायचे अशी कामे करावी लागली. मात्र हळूहळू कधीतरी एखाद्या रंगमंचावरचे बारीकसे काम मिळू लागले. संत तुकाराम, हॅम्लेट, झुंजाराव अशा नाटकामधून लहान कामे करू लागले. पण नुसत्या अन्नावर किती दिवस राबवायचे. दीड दोन वर्षे कसेबसे काढून घाणेकरांनी प्रतिभा नाटक मंडळीला रामराम केला आणि ते महेश नाटक कंपनीत सामील झाले. या नाटक कंपनीचा मुक्काम कोल्हापूरला असताना घाणेकर कंपनीत आले. इथे मात्र त्यांना पगार मिळू लागला. पगार होता ४५ रुपये. या कंपनीत घाणेकर रंगभूषा करायला आणि वेशभूषा करायला शिकले.

पुढे त्या काळात प्रथेप्रमाणे प्रत्येक नाटक कंपनी फुटली आणि घाणेकर बालमोहन कंपनीत सामील झाले. तिथे फाटाफुटीनंतर कंपनी बंद झाली. मात्र आता मुंबईत घाणेकर प्रामुख्याने मेकअपमनमधून परिचित झाले होते. आचार्य अत्रे यांनी मोरूची मावशी आणि ब्रह्मघोटाळा या चित्रपटांच्या रंगभूषेचे काम घाणेकरांना दिले. हळूहळू शंकर घाणेकर यांचा मुंबईत जाऊन जम बसू लागला. सांगकामे करणारे आणि मूळ गुहागरचे वामनराव पटवर्धन यांच्याशी त्यांची ओळख झाली. वामनराव घाणेकरांना घेऊन साहित्य संघात डॉक्टर भालेराव यांना भेटले. घाणेकरांच्या पत्रिकेतील शुभ ग्रह एकत्र आले. इथे घाणेकरांना भाऊबंदकी, खडाष्टक अशा नाटकांमधून भूमिका करण्याची संधी मिळाली. घाणेकर चांगले नट आहेत याची नाट्य रसिकांना खात्री पटली. लहानपणी संस्कृतची साथ घेतली असल्याने वाणी शुद्ध, उच्चार स्पष्ट असल्याने आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या अभिनयामुळे पुढे पुण्य प्रभाव, विद्याहरण, भावबंधन, एकच प्याला, बेबंधशाही, आग्र्याहून सुटका अशा नाटकांत त्यांच्या विविध भूमिका गाजल्या. नाटक कंपन्या बंद पडल्याने पुढे ठेकेदार मंडळी नटरंग एकत्र करून प्रयोग करू लागले. घाणेकर अशा नाटकांमधून मिळेल त्या भूमिका करत असत. संगीत शारदामधून वृद्ध श्रीमंताचे काम करत. शेकड्याने प्रयोग झाले. या नाटकात बाबुराव गुरव ही भूमिका शंकर घाणेकरांना मिळाली. नाटकाचा नायक दिगूची भूमिका भालचंद्र पेंढारकर करत. दिगूच्या बहिणीचे पती पंत हे नाटकातील खलनायक त्यांचे काम नटश्रेष्ठ मामा पेडसे करत. संपूर्ण नाटकात घाणेकरांचा बाबुराव प्रचंड गाजला. वाक्यावाक्याला हशा आणि टाळ्यांचा गजर व्हायचा.

या बाबुरावने शंकर घाणेकर यांनी मराठी दर्शकांचे मन जिंकले. विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकात घाणेकर यांची कलमदराची भूमिका भाव खाऊन जायची. १९६७ ला नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकरांचे कट्यार काळजात घुसली हे नाटक रंगभूमीवर आणले. या नाटकातला कविराज बांगे बिहारी शंकर घाणेकर करायचे. नाटकातील रंगमंचावरची एन्ट्री कवी भूषणाच्या वजीरभाषेतल्या काव्यपंक्ती अशा आक्रमक शब्दात पेश करायचे की प्रेशाग्रहातून टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. शंकर घाणेकर यांच्या अकाली निधनानंतर अनेक कलाकारांनी ही बाके बिहारीची भूमिका केली पण घाणेकरांची सर कुणालाच नव्हती. घाणेकर दिसायला देखणे नव्हते पण अभिनयात ते राजे होते. शब्दाचे सामर्थ्य त्यांना चांगले ठाऊक होते. मात्र भूमिकेशी एकरूप झाल्यानंतर त्यांची सवाद फेक विलक्षण असायची. वाक्यवाक्यांचे चढ-उतार आवाजातून स्पष्ट व्हायचे. त्यांच्या वक्तृत्वामुळे पु. ल. देशपांडे यांनी विनोदवीर म्हणून तर नाटककार वसंत सबनीस यांनी तू बोलतोस ते ठीक आहे, लिहायला लागलास तर आम्हाला कामच राहाणार नाही असे म्हटले होते. शंकर घाणेकर यांनी काही चित्रपटांत काही काम केले पण त्यांचा जीव रंगमंचावरच रमायचा.

घाणेकर मुंबईतच राहिले पण आपल्या गावाला कधीच विसरले नाहीत. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या शेतात त्यांनी झालेले आक्रमण काढून तिथे हनुमान मंदिर बांधले. आजही त्या मंदिरात घाणेकर यांची छायाचित्र लावलेली आहेत. दरवर्षी गावात ते नाटक सादर करायचे. ग्रामदैवत सोमेश्वरसमोर रंगमंचावर घाणेकर आतून कीर्तन वरून तमाशा हे नाटक करणार होते. कलाकारांचा संच घेऊन आले. नाटक सुरू झाले. पहिल्या अंकात कोतवाल झालेले घाणेकर झोपले होते. ऑर्गन वाजत होता. आता कोतवाल उठेल आणि हास्याचा धबधबा सुरू होईल म्हणून प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. मात्र कोतवाल कधी उठणार नव्हता. घाणेकर उठत नाही म्हणून पडदा पडला. शंकर घाणेकरच्या आयुष्यावर अखेरचा पडदा पडला. मार्च २० मार्च १९७७ला शंकर घाणेकर नटराज्याच्या दरबारात स्वर्गात सामील झाले.

Comments
Add Comment