मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल ११ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे.
प्रारूप यादी तपासताना ११,०१,५०५ मतदार दुबार असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे एक लाख मतदारांची नावे तीन किंवा चार वेगवेगळ्या यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या पश्चिम उपनगरांची (४,९८,५९७) असून, पूर्व उपनगरात ३,२९,२१६ आणि मुंबई शहरात २,७३,६९२ दुबार नोंदी आढळल्या आहेत.
मतदारयादीवरील हरकती आणि सूचनांसाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील एकूण मतदारसंख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी असून, त्यापैकी ११ लाखांहून अधिक नावे पुनरावृत्तीची असल्याने निवडणूक आयोग आणि महापालिका या दोघांवरही दुरुस्तीचे मोठे दडपण आले आहे.
महापालिकेने दुबार मतदारांची समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदारयादीत जे मतदार दुबार नोंदले गेले आहेत, त्यांची नावे स्वतंत्रपणे चिन्हांकित करण्यात आली आहेत. अशा मतदारांना स्वतःहून आपले अतिरिक्त नाव वगळण्याची संधी दिली जाणार असून, अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी जर एखाद्या मतदाराची दुबार नोंदणी आढळली, तर त्या व्यक्तीकडून दुसरीकडे मतदान केले नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे मतदारयादीतील चुका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






