पर्यटनातून कोकणच्या अर्थकारणाला गती

- रवींद्र तांबे


कोकण आणि पर्यटन यांचे एक अतूट असे नाते आहे. येथील ऐतिहासिक गड-किल्ले आणि तेवढेच विलोभनीय समुद्रकिनारे यामुळे येथील पर्यटनाला ऊर्जा मिळत आहे. गेल्या १० वर्षांत पर्यटकांची संख्या अद्भुतरीत्या वाढली आहे. एक-दोन लाख पर्यटक जिथे भेट द्यायचे तेथे लाखो पर्यटक हजेरी लावतात. समुद्रकिनारी येणारे ४०० पक्षी, नव्याने सुरू झालेले वॉटर गेम यामुळे येथील पर्यटन वाढू लागले आहेत.


कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३० एप्रिल, १९९७ रोजी पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. या ठिकाणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून जिल्ह्याचा विकास साधण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असून तिचा योग पद्धतीने वापर केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण आर्थिक विकास होऊ शकतो. याचा विचार करून भारत सरकारने देशातील पहिला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. त्या दृष्टीने नवनवीन उद्योग निर्मिती सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या जिल्ह्यात वाढत आहे. यामध्ये चुलीवरच्या जेवणाला पर्यटकांची जास्त पसंती दिसते. तेव्हा पर्यटन ठिकाणी स्थानिक महिला वर्गाला काम मिळत असल्याने त्या जास्त खुशीत असताना दिसत आहे. तेवढीच संसाराला आर्थिक मदत होत असल्याचे समाधान त्यांना होत आहे. अलीकडे तर पर्यटन ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांना चांगले आर्थिक दिवस आलेले आहेत. सन २०२२-२३ च्या चालू किमतीनुसार राज्यापेक्षा रुपये ७९१५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे जास्त दरडोई उत्पन्न आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाल्याने आणि १२१ कोलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभल्याने जिल्ह्यातील मासेमारी आणि मत्स्य-आहार पर्यटन व्यवसायाला उत्तम प्रकारे चालना मिळत आहे. त्यात सुकी मासळीला सुद्धा बऱ्यापैकी दर येत आहेत. सन २०२३-२४ मध्ये १७९७६ मे. टन मस्त्योत्पादन झाले होते. यातून चांगल्याप्रकारे अर्थप्राप्ती सुद्धा होत असल्याने मत्सव्यवसायिक समाधानी दिसत आहेत. त्याला पावसाळ्यातील पूर परिस्थिती अपवाद आहे. नारळ, सुपाऱ्यांना चांगला दर येत आहे. इतकेच नव्हे तर सुख्या मेव्याला चांगले भाव मिळत आहेत. खडखडे लाडू, मालवणी खाजा आणि खोबऱ्याची गोड वडी भाव खावू लागली आहे. त्यात सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांनी पर्यटकांना विकत घेण्यासाठी आकर्षण केलेले आहे. एक आठवण म्हणून पर्यटक हमखास लाकडी खेळणे खरेदी करतात. त्यामुळे लाकडी खेळण्याला मागणी वाढत आहे. ही खेळणी केवळ देशात नव्हे तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहेत. तसेच विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि गेस्ट हाऊसमध्ये पर्यटक वाढल्याने त्यांच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ होत असल्याने त्यांच्यापण व्यवसायाला उभारी मिळत आहे. यामध्ये स्थानिक बेरोजगारांना काम मिळत आहे. तसेच कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागाचा विकस होत असल्याचे दिसून येत आहे. यात जिल्ह्यातील स्थानिक कार्यक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे. आनंदाची बाब म्हणजे पर्यटनामुळे जिल्ह्याच्या महसुलात अधिक वाढ होत आहे. एखाद्या विषयाचा अभ्यास, जीवनात आनंद, एखादा व्यवसाय करणे, विश्रांती घेणे आणि जीवनात मनोरंजन करण्यासाठी एखाद्या ठिकाणी जातो त्याला आपण सर्वसाधारणपणे ‘पर्यटन’ म्हणतो. कोकण विभागाचा विचार करता देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव घोषित झाल्यानंतर दिवसेंदिवस पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास पाहाता पर्यटकांना आकर्षित करणारा जिल्हा आहे. यात निसर्गनिर्मित नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छ हवा, स्वच्छ समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक दृष्ट्या विविध किल्ले पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. त्यात अधिक भर पडत आहे ती म्हणजे कोकणातील मालवणी बोलीभाषा होय. त्यामुळे अलीकडच्या काळात गोवा राज्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटक अधिक पसंती देत आहेत.


काही गावातील वाड्यांमध्ये डांबरी रस्ते नसले तरी महामार्गाचे रुंदीकरण होत आहे. जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वे सेवा आणि विमान सेवा नियमित नसली तरी अधूनमधून सुरू आहे. लालपरी, खासगी वाहने किंवा स्वत:च्या वाहानाने प्रवास करीत पर्यटक उत्साहाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याच्या सान्निध्यात येत असतात. त्यात काही स्थानिक ठिकाणी बैलगाडीतून पर्यटकांना फिरण्याचा आनंद मिळतो. यामुळे या क्षेत्राचा विकास वेगाने होताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. काहींनी आपल्या व्यवसायाचे आकर्षक जाहिराती करून पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. याचा परिणाम त्यांच्या आर्थिक उत्पन्नात समाधानकारक वाढ होताना दिसून येत आहे. त्यांच्या आसपासच्या बेकार युवकांच्या हातांना काम मिळाले आहे हे जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचे आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कामे चाललेली असली तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर अधिक विकास होणे गरजेचे आहे. तसेच शासकीय अर्थसहाय्य सुद्धा तत्काळ मिळायला हवे. सध्या महिला बचत गटांना सुद्धा चांगले दिवस आलेले दिसून येत आहेत. तेव्हा उत्पादित केलेल्या मालवणी मेव्याला अधिक सुगीचे दिवस येतील त्याप्रमाणे शासन स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांना शासकीय अनुदान वाढवून दिले गेले पाहिजे. काही उत्पादित केलेला माल आठवडा बाजाराला जाऊन विकला जातो. मात्र इतर वेळेला माल विकण्यासाठी माफक दरात उपलब्ध होणे आवश्यक आहे. यात नाशवंत मालाची विक्री न झाल्यास उत्पादकाला तोटा सहन करावा लागतो. अशा वेळी अनुदानातून मिळणाऱ्या रकमेवर सूट मिळायला हवी. काही वेळा नैसर्गिक आपत्ती आल्यास सूट दिली जाते. ती सूट ताबडतोब जाहीर होऊन नुकसानभरपाई नुकसानग्रस्त धारकांना ताबडतोब त्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवी. म्हणजे व्यवसायिक पुन्हा आपल्या व्यवसायाला जोमाने सुरुवात करतील. असे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यात झाले तर खऱ्या अर्थाने कोकणाच्या अर्थकारणाला पर्यटनातून गती मिळेल.


सागरी पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक किल्ल्यांवरील पर्यटनालाही बहर आलेला पाहायला मिळतो. कोकणात लहान-मोठे २५० किल्ले आहेत; पण यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, जंजिरा, विजयदुर्ग आणि जागतिक वारसास्थळ म्हणून ज्याची नोंद झाली ते खंदेरी-हुंदेरी अशा किल्ल्यांवरील पर्यटनाला अधिक पसंती मिळत आहे.


या पर्यटनवाढीसाठी नव्या पर्यटन धोरणामध्ये कोणत्या धोरणास मंजुरी मिळणार, यावर पर्यटनवाढीचा आलेख अवलंबून असणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गडकिल्ले पर्यटनाला सकारात्मक ऊर्जा देत आहे. हे किल्ले जतन आणि संवर्धन केले, तर इतिहासाच्या या पाऊलखुणा प्रेरक स्वरूपात पर्यटकांसमोर येऊ शकतील. किल्ले रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याचा प्रकल्प गेले चार वर्षे प्रलंबित आहे. या शिवसृष्टीच्या प्रकल्पामुळे किल्ले रायगडला नवी ओळख मिळू शकणार आहे. कोकणातील जत्रोत्सव हेसुद्धा पर्यटकांचे केंद्रबिंदू आहे. आंगणेवाडीची भराडीदेवी जत्रोत्सव, कुणकेश्वर जत्रोत्सव, रत्नागिरीतील मार्लेश्वर, रायगडमधील विठोबा आणि दत्ताची जत्रा या जत्रोत्सवासाठी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे या पुरातन मंदिरांचा विकास नक्कीच पर्यटनाला ऊर्जा देईल.

Comments
Add Comment

नगरपरिषद निवडणुकांनी विदर्भात घुसळण

अविनाश पाठक विदर्भातील ८० नगर परिषदा आणि २० नगरपंचायत यांच्यातील निवडणुका जाहीर होऊन आता काळ पुढे सरकला आहे.

नाशिकमध्ये आघाडी आणि युतीतही खो!

जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमने-सामने आले आहेत. भाजप पाच ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.

मृत्यू इथले संपत नाही

पुणे शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे-बंगळूरु महामार्गावरील नवले पुलाचा परिसर गेली अनेक

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला वाघाचा आधार लाभला!

चांदोलीच्या जंगलात तीन वाघ कॅमेऱ्यात कैद झाले तरी त्यांचे वास्तव्य येथे नाही या सत्यावर उपाय शोधत

कार्यकर्त्यांची निवडणूक

स्थानिक स्वराज्यसंस्थेची ही निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाची जशी त्याच्या अस्तित्वाची आहे. तशी ही निवडणूक

खासदार सांस्कृतिक महोत्सव ठरतो आहे प्रमुख आकर्षण

वार्तापत्र : विदर्भ एखाद्या परिसरातील लोकनेता जर कल्पक असला, तर त्या परिसराचा सर्वांगीण विकास होऊ शकतो याचे