Saturday, November 22, 2025

T20 World Cup 2026: संभाव्य गट जाहीर होण्याआधीच माहिती लीक; भारत–पाकिस्तान पुन्हा एकाच गटात

T20 World Cup 2026: संभाव्य गट जाहीर होण्याआधीच माहिती लीक; भारत–पाकिस्तान पुन्हा एकाच गटात

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ ची तयारी जोरात सुरू असून, अधिकृत गटवाटप २५ नोव्हेंबरला जाहीर होणार असले तरी संभाव्य गटांची प्राथमिक माहिती आधीच समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमान म्हणून स्पर्धा आयोजित करत आहेत. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ८ मार्चला अंतिम सामन्याने संपणार आहे. या वेळच्या विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होत असून प्रत्येक गटात पाच संघ ठेवण्याची योजना आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील या चार गटांपैकी भारताचा गट तुलनेने सोपा मानला जात आहे. तर श्रीलंकेचा गट अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो अशी माहिती समोर आली आहे.

भारतातील संभाव्य गटात पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश असेल. दोन कसोटीयोग्य संघांव्यतिरिक्त इतर तीन संघ तुलनेने कमी अनुभवी असल्याने भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठी सुपर एट फेरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा असू शकतो. भारताचा पहिला सामना ८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये नामिबिया, १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि १८ फेब्रुवारीला मुंबईत नेदरलँड्सविरुद्ध भारताचे सामने होतील. भारत-पाकिस्तानचा सामना नेहमीप्रमाणेच सर्वाधिक चर्चेचा असून तो कोलंबोमध्ये खेळवला जाऊ शकतो.

दुसरीकडे, श्रीलंका अत्यंत आव्हानात्मक गटात सामील होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या गटात ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान यांसारखे प्रतिस्पर्धी संघ असू शकतात. उर्वरित गटही तितकेच ताकदवान आणि स्पर्धात्मक आहेत. इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली यांचा समावेश असलेला गट, तसेच दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, यूएई आणि कॅनडा असलेला गट, हे दोन्ही गट प्राथमिक फेरीत चुरशीचे आणि थरारक सामने घडवून आणतील, असे स्पष्ट दिसते.

भारत आणि श्रीलंका मिळून या स्पर्धेसाठी आठ शहरांत सामने आयोजित करतील. भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद ही प्रमुख शहरे असतील, तर श्रीलंकेत कोलंबो आणि कँडी येथील मैदानांचा वापर केला जाईल. अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे; मात्र पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास हा सामना श्रीलंकेत हलवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच उपांत्य फेरीसाठी मुंबई, कोलकाता आणि कोलंबो या स्थळांची निवड संघांच्या प्रगतीनुसार केली जाणार आहे.

स्पर्धेच्या स्वरूपानुसार प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर एट फेरी गाठतील. त्यानंतरच्या टप्प्यातून उपांत्य फेरी निश्चित होईल आणि अखेर विजेतेपदासाठी दोन संघ ८ मार्च रोजी अंतिम लढत देतील. अधिकृत गटवाटपाची घोषणा ICC २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत करणार असून त्यानंतर संपूर्ण वेळापत्रक आणि स्थळांची अंतिम यादी समोर येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा