नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. मात्र याच कुंभमेळ्यात साधुग्राम बांधण्यासाठी इथल्या तपोवन परिसरातील अनेक वृक्षांची कत्तल केली जातेय.तपोवन येथे हजारो झाडं तोडली जातायत. आता कुंभमेळ्यासाठी झाडं तोडण्याची प्रक्रिया सुरू झालीये. त्यामुळे पर्यावरणप्रेमी चांगलेच संतापलेत. अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारला धारेवर धरलंय. तुम्ही १ झाड तोडून २०० झाडं कुठं लावताय ते आधी दाखवा असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारलाय.
माध्यमांशी बोलतां सयाजी शिंदे म्हणाले, 'तपोवनमधील झाडे तोडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक सोहळ्यासाठी झाडांची कत्तल करणे योग्य नाही. तुम्ही एक झाड तोडून दहा झाडे लावू असे विधान करता, पण ते फालतू आहे. आम्ही एकही झाड तोडू देणार नाही. एक झाड वाचवण्यासाठी १०० माणसं उभी राहतील, पण ते झाड तोडू देणार नाही. सरकार आपलं असूनसुद्धा बेजबाबदार वागते आहे. मला अनेक फोन येतायत. नागपुरात ४५ हजार झाडे तोडणार आहेत, कर्जतमध्येही तसेच. आपल्या डोळ्यांसमोर जी झाडे तोडली जात आहेत, ती आपण वाचवली पाहिजेत; नाहीतर माणसं पेटून उठतील.' ते पुढे म्हणाले, 'सरकारने डोळे उघडले पाहिजेत. तुम्ही किती झाडे लावली त्याचा हिशोब द्या. लोकांनी आवाज उठवला की तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण बोलणाऱ्याला बोलता आले पाहिजे. आपल्याकडे लोकशाही आहे की, हुकुमशाही हेच समजत नाही. झाडांवर राजकारण करू नका.' सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीला कडाडून विरोध केला असून त्यांनी सरकारकडे आधी उत्तराची मागणी केलीये. वृक्षतोड करून पुढची पिढी कशी जगेल याचा विचार केलाय का असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारलाय.






