अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमधील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतांश नगरपालिकेत भाजप अजित पवार राष्ट्रवादी युती विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे. अलिबाग, रोहा, कर्जत आणि माथेरान या चार नगर परिषदांमध्ये दुरंगी, तर मुरुड व पेण नगरपरिषदेत तिरंगी लढती होणार आहेत. उरण आणि श्रीवर्धन नगर परिषदांमध्ये चौरंगी, महाड नगर परिषदेत पंचरंगी, तर खोपोली नगर परिषदेत बहुरंगी सामने होत असले, तरी खरा सामना हा युतीतील मित्र पक्षात असणार आहे.
अलिबाग नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. कविता प्रविण ठाकूर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. परिणामी नगराध्यक्ष पदासाठी आता शेकाप, काँग्रेस, मनसे आघाडीच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक आणि भाजपा, शिंदे शिवसेनेच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांच्यात थेट दुरंगी लढत होणार आहे. नगरसेवकांच्या २० जागांपैकी एका जागी शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध विजयी झाल्याने आता १९ जागांकरिता ४१ उमेदवार रिंगणात आहेत.
रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वनश्री शेडगे विरुद्ध शिवसेना पक्षाच्या शिल्पा धोत्रे अशी थेट लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने नगरसेवक पदाच्या १९ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र जैन हे बिनविरोध आले आहेत. नगरसेवक पदाच्या १९ जागेसाठी विविध पक्षाच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १९, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ५, शिवसेना ४, भारतीय जनता पार्टी ३, अपक्ष ६ हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाड नगर परिषदेत चेतन उर्फ बंटी गजानन पोटफोडे शिवसेना उबाठा गट, सुदेश शंकर कलमकर राष्ट्रवादी काँग्रेस, सुनील वसंत कविस्कर शिवसेना व अन्य दोन अपक्ष उमेदवार अशी पंचरंगी लढत होणार आहे, तर नगरसेवक पदाच्या २० पदांकरिता ४८ उमेदवार रिंगणात आहेत.
माथेरान नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्येच खरी लढाई असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले असून, अंतर्गत तिकीट नाकारलेल्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांना त्याचा थेट फटका काही प्रभागांमध्ये बसणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट व आरपीआय राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे शिवराष्ट्र पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गट, भाजपा आरपीआय पक्षाचा एक गट अशी महायुती या निवडणुकी सामोरे जाणार आहे. नगराध्यक्ष पदाकरिता महायुतीकडून चंद्रकांत चौधरी, तर शिवराष्ट्र पॅनलकडून अजय सावंत यांच्यामध्ये ही निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. नगरसेवक पदाच्या २० जागांकरिता ४६ उमेदवार रिंगणात आहेत.
कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गट यांच्या महापरिवर्तन विकास आघाडीच्या पुष्पा दगडे आणि भाजपा, भाजप शिवसेना पक्ष या युतीच्या डॉ. स्वाती लाड यांच्यात थेट लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २१ जागांकरिता ४२ उमेदवार रिंगणात आहेत.
पेणमध्ये भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध पेणकर आघाडी पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीच्या प्रितम पाटील, पेणकर आघाडीच्या रिया धारकर आणि काँग्रेसच्या नंदा म्हात्रे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजप-राष्ट्रवादी एकत्र येत असताना शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढत आहे. पेण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच सहा नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. हे सहाही नगरसेवक भाजप आणि राष्ट्रवादी युतीचे आहेत. यामुळे आता १८ नगरसेवक पदासाठी ४६ उमेदवार रिगंणात आहेत.
मुरुडमध्ये थेट नगराध्यक्षा पदासाठी शिंदे शिवसेना पक्षांच्या कल्पना पाटील, शेकापच्या अंकिता माळी आणि अजित पवार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आराधना दांडेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २० जागांकरिता ५८ उमेदवार आता रिंगणात आहेत.
श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र सातनाक, भाजप शिवसेना पक्षाच्या अक्षता श्रीवर्धनकर, शिवसेना उबाठा पक्षाचे अतुल चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविंद्र चौलकर अशी चौरंगी लढत होणार आहे, तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ६० उमेदवार रिंगणात आहेत.
उरण नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शोभा कोळी, महाविकास आघाडीकडून भावना घाणेकर, भाजप शिवसेना पक्षाकडून रुपाली ठाकूर, तर अपक्ष शेख नसरीन इसरार अशी चौरंगी लढत होणार आहे. नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे भाजपा आमदार महेश बालदी यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे.
खोपोली नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपा विरुद्ध शिवसेना (शिंदे) पक्ष अशी लढत होत आहे. येथे राष्ट्रवादीचे सुनील पाटील आणि भाजप शिवसेना पक्षाचे कुलदीप शिंदे यांच्यात खरी लढत होणार आहे. अन्य सात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या ३१ जागांकरिता १५४ उमेदवार रिंगणात आहेत.






