Saturday, November 22, 2025

महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. यासाठी १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत सर्व प्रशासकीय विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता मागील ११ नोव्हेंबर रोजी २२७ पैकी एसटी, एससी, ओबीसी, महिला वर्ग तसेच खुला प्रवर्ग याकरता आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी आरक्षित जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये, २२७ जागांमधून एसटी - २ , एससी - १५ , ओबीसी - ६१ , महिलांसाठी ११४ जागांसाठी काढण्यात आलेली सोडत जाहीर करण्यात आली होती.
त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांना धक्का बसला. अनेकांचे प्रभाग महिला आरक्षित तसेच ओबीसी झाल्याने अनेकांना घरी बसणे नाहीतर आसपासच्या प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली. या आरक्षण सोडतीबाबत निवडणूक विभागाने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत हरकती - सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार, २० नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवसापर्यंत विविध विभागातून १२९ हरकती - सूचना दाखल झाल्या झाल्याची माहिती मिळत आहे.

यावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे २१ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत सदर हरकती आणि सूचना यांवर योग्य तो निर्णय घेतील. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment