नगरपरिषद निवडणुकांनी विदर्भात घुसळण

अविनाश पाठक


विदर्भातील ८० नगर परिषदा आणि २० नगरपंचायत यांच्यातील निवडणुका जाहीर होऊन आता काळ पुढे सरकला आहे. निवडणुकांची अधिसूचनाही जाहीर झाली आणि अर्ज दाखल करण्याची तारीखही निघून गेली आहे. आज हे वार्तापत्र लिहीत असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून दिवससंपेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतलेले असतील. त्यानंतर विदर्भातील निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल. चांगलीच गती आलेली दिसते आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे त्या-त्या परिसरातील आमदार, पालकमंत्री, खासदार अशा सर्व तत्सम नेत्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागत असते. तशी विदर्भातही लागणार आहे. मात्र खरी कसोटी लागणार आहे ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाची. काँग्रेसमध्ये महाराष्ट्र स्तरावर नेतृत्व बदल होऊन जेमतेम चार-पाच महिने झाले आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने बुलढाणा जिल्ह्याकडे हे नेतृत्व आले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या कालखंडात पक्षात नवे चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. त्यामुळे आता विदर्भात काँग्रेसला किती यश मिळते त्यावर सपकाळांचे नेतृत्व महाराष्ट्रात कितपत यशस्वी ठरू शकते हे ठरवले जाणार आहे. परिणामी विदर्भातील यशापयश हे काँग्रेसकरिता विशेष महत्त्वाचे राहणार आहे. विदर्भातील आजचे राजकीय चित्र बघता खरी लढत ही भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांतच होणार आहे हे निश्चित. त्या खालोखाल वंचित बहुजन आघाडी ही बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये आपले थोडेफार का होईना पण अस्तित्व ठेवून आहे. उर्वरित दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांना तर आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच या निवडणुकीत बरीच धडपड करावी लागणार आहे. महाराष्ट्रात आम्ही शक्यतोवर महायुती म्हणून एकत्रच लढू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत असले तरी विदर्भात देखील कुठेच महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र लढताना दिसत नाहीत. त्यातच मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झालेली दिसते आहे. सर्वच पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचे बंडखोरांना विविध आमिषे दाखवून शांत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आज दिवसाअखेर जितके प्रयत्न यशस्वी होतील तितके बंडखोर खाली बसतील. अन्यथा बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढती या स्पष्ट दिसत आहेत.


पश्चिम विदर्भातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीतील राजकारणावर यंदा नातेसंबंधांचा पगडा स्पष्टपणे जाणवतो. विविध पक्षांकडून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज सादर झालेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देण्याची परंपरा बाजूला सारत अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या जवळच्या नातेवाइकांनाच थेट रिंगणात उतरवले. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील २५ नगर परिषदांमध्ये तब्बल दहा ठिकाणी नेत्यांच्या पत्नी, वहिनी, भाऊ आणि सून उमेदवार म्हणून उभे आहेत. बुलढाणा जिल्ह्यात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची वहिनी अपर्णा फुंडकर या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. बुलडाणा नगरपालिकेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता शिंदे रिंगणात उतरल्याने चुरस वाढली. अकोला जिल्ह्यात माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्या पत्नी रजिया बेगम या वंचित बहुजन आघाडी नगरविकास फ्रंटतर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. अकोटमध्ये माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांची सून तसेच माजी नगराध्यक्ष संजय बोडखे यांच्या पत्नी अलका बोडखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. मूर्तिजापूर येथे भाजप आमदार हरिष पिंपळे यांचे भाऊ उपेंद्र नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत. वाशीममध्ये कारंजा नगर परिषदेत भाजप नेते नरेंद्र गोलेच्छा यांची सून निशा यांना उमेदवारी मिळाली. एमआयएमचे युसूफ पुंजाणी यांच्या आई फरिदाबानू व सून फिज्झा यांनाही उमेदवारी जाहीर झाली. या निवडणुकीत महायुती तसेच महाविकास आघाडीतील विविध पक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय सोपवत हात वर केले. यामुळे बुलडाण्यात महायुतीचे घटक पक्षच समोरासमोर आले. शिवसेना विरुद्ध भाजप उमेदवार समोरासमोर लढणार आहेत. उमेदवारी मागे घेतल्यानंतर लढती स्पष्ट होईल. नगरसेवक, अध्यक्ष पदासाठी विविध राजकीय पक्षांकडून कार्यकर्ते, पदाधिकारी स्पर्धेत होते. सर्वांनाच उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने ऐनवेळी बंडखोरी झालेली आहे. काही जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली.


भाजप हा पार्टी विथ ए डिफरन्स म्हणून ओळखला जात असला तरी या पक्षाची आता जवळजवळ काँग्रेसच होते आहे की काय असे चित्र दिसू लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर इथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्वच पक्षातून इलेक्टिव्ह मेरिट असणारे जे जे बंडखोर असतील त्यांना भाजप आपल्याच सामावून घेताना दिसत आहे. त्यामुळे आता भाजपही पार्टी विथ ए डिफरन्स न राहता डिफरंट पार्टी म्हणूनच ओळखली जाईल की काय असे वाटू लागले आहे. तरीही अजूनही भाजपचे अगदी बूथ लेवलपर्यंतचे नेटवर्क भाजपच्या मदतीला येईल हे चित्र या क्षणी तरी दिसते आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक बांधणीच्या नावाने नुसतीच बोंब आहे. प्रत्येक जण स्वतःला नेताच समजतो आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही असे चित्र आहे. नागपुरात सुनील केदार यांच्याविरोधात प्रचंड नाराजी असून मोठ्या प्रमाणात तालुकास्तरावरचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामे देऊन बाहेर पडलेत. अशा स्थितीत काँग्रेस आव्हान कसे पेलेल हा प्रश्नच आहे. अर्थात पक्षाच्या नेटवर्कसोबत प्रत्यक्ष उमेदवाराची समाजात असलेली प्रतिमा आणि त्याचा त्या मतदारसंघात असलेला संपर्क हा देखील कामी येईल. त्यामुळे निकाल नेमके काय लागतील हे आज सांगणे कठीण आहे. या निवडणुकीत विदर्भातील सर्वच पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, अशोक उईके, आकाश फुंडकर, आशीष जयस्वाल, तसेच प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, कृपाल तुमाने, प्रताप अडसड, रणजीत सावरकर, चैनसुख संचेती, अनिल देशमुख या सर्वांचेच राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे. अशाही परिस्थितीत आज महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्ता स्थानी असल्यामुळे विदर्भात भाजपची हवा चांगली आहे. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अशोक उईके असे अनेक ज्येष्ठ मंत्री तसेच वरिष्ठ नेते विदर्भातीलच आहेत. त्यामुळे या क्षणी तरी विदर्भात भाजपला वातावरण अनुकूल दिसते आहे. अर्थात ज्या ठिकाणी स्थानिक उमेदवार चांगल्या प्रतिमेचा आणि चांगल्या संपर्काचा असेल त्या ठिकाणी तो कोणत्याही पक्षाचा असला तरी निवडून येण्याची संधी जास्त राहील. असेही असले तरी विदर्भात भाजप निवडून येण्याची शक्यता जास्त दिसते आहे. अर्थात या निवडणुका आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत हवेचा झोत कसा येईल आणि परिस्थिती कशी बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे निवडणूक निकाल काय लागेल हे चित्र ३ डिसेंबरलाच स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

पर्यटनातून कोकणच्या अर्थकारणाला गती

- रवींद्र तांबे कोकण आणि पर्यटन यांचे एक अतूट असे नाते आहे. येथील ऐतिहासिक गड-किल्ले आणि तेवढेच विलोभनीय

नाशिकमध्ये आघाडी आणि युतीतही खो!

जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आमने-सामने आले आहेत. भाजप पाच ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.

मृत्यू इथले संपत नाही

पुणे शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पुणे-बंगळूरु महामार्गावरील नवले पुलाचा परिसर गेली अनेक

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला वाघाचा आधार लाभला!

चांदोलीच्या जंगलात तीन वाघ कॅमेऱ्यात कैद झाले तरी त्यांचे वास्तव्य येथे नाही या सत्यावर उपाय शोधत

कार्यकर्त्यांची निवडणूक

स्थानिक स्वराज्यसंस्थेची ही निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाची जशी त्याच्या अस्तित्वाची आहे. तशी ही निवडणूक

खासदार सांस्कृतिक महोत्सव ठरतो आहे प्रमुख आकर्षण

वार्तापत्र : विदर्भ एखाद्या परिसरातील लोकनेता जर कल्पक असला, तर त्या परिसराचा सर्वांगीण विकास होऊ शकतो याचे