नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात पोलिसांना मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या दहशतवादी मुझम्मिल शकील गनईने स्फोटक तयार करण्यासाठी अगदी साधी घरघंटी म्हणजेच पिठाची गिरणी आणि इलेक्ट्रिक मशीनचा वापर केल्याचे समोर आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील मुझम्मिल शकीलने हरियाणातील फरीदाबादमध्ये भाड्याने खोली घेतली होती. तिथेच तो युरिया बारीक करून, त्यातून अमोनियम नायट्रेट वेगळे करण्याची प्रक्रिया करत होता. पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी त्याच जागेवरून तब्बल ३६० किलो अमोनियम नायट्रेट आणि विविध स्फोटक साहित्य जप्त केले आहे. मुझम्मिल फरीदाबादच्या अल फलाह यूनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. या कटात त्याच्या सोबत स्थानिक टॅक्सी ड्रायव्हरही होता. एनआयएने त्या चालकाला ताब्यात घेतले आहे.






