राजरंग : राज चिंचणकर
रंगमंचावर प्रयोग सादर करताना संबंधित मंडळींना कोणत्या प्रसंगांना कधी आणि कसे सामोरे जावे लागेल याची शाश्वती नाही. कधी काय घडेल आणि कधी काय करावे लागेल, याचा अंदाज आधी येत नाही. पण असा एखादा प्रसंग अचानक समोर उभा राहिला, तरी 'शो मस्ट गो ऑन' या उक्तीनुसार तो प्रयोग पूर्णत्वास न्यावा लागतो. अर्थात, नाट्यसृष्टीत याची उदाहरणे अनेक आहेत. अशाच प्रकारची एक घटना, अखिल महाराष्ट्रात तमाशाचा फड गाजवणाऱ्या लावणीसम्राज्ञी सीमा पोटे नारायणगांवकर यांच्या आयुष्यात घडली. ही घटना अगदीच संवेदनशील म्हणावी लागेल; कारण ती त्यांच्या वडिलांच्या बाबतीतली आहे. रंगदेवतेची सेवा करण्याचे घेतलेले व्रत, एखादा कलाकार वैयक्तिक दुःख बाजूला सारून कसे पूर्णत्वास नेतो, हे अधोरेखित करणारी ही घटना आहे. खास 'राजरंग' कॉलमसाठी सीमा पोटे नारायणगांवकर यांनी सांगितलेला हा प्रसंग...
नंदुरबार तालुक्यातल्या एका गावात असलेल्या यात्रेत आमचा एक प्रयोग होता. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे तमाशा मंडळ होते आणि आम्ही त्या तमाशा मंडळातून काम करत होतो. त्यात मी एकटीच नव्हे; तर माझ्यासोबत माझे आई-वडील, माझी बहीण आणि माझे पती सुधाकर पोटे असे सर्व होतो. राजीव गांधी यांच्या जीवनावरचे ते नाट्य होते. माझ्या वडिलांनाही त्यात छोटीशी भूमिका होती. ही घटना आहे १९९३ सालातली...!
आमच्या त्या प्रयोगाच्या वेळी अचानक माझ्या वडिलांच्या छातीत दुखायला लागले. त्यावेळी आवश्यक ती औषधे आम्हाला त्या गावात काही मिळू शकली नाहीत. साहजिकच परिस्थिती तणावाची बनली होती. रंगभूमीशी बांधिलकी असल्याने, काही झाले तरी आम्हाला प्रयोग तर करायचाच होता. त्या संध्याकाळी आमचा प्रयोग सुरू झाला आणि त्या प्रयोगाच्या दरम्यान माझ्या वडिलांचा आणि पतींचा प्रसंग सुरू असतानाच माझ्या वडिलांच्या छातीत कळ आली. मात्र त्यांनी रंगमंचावर घेतलेली 'एन्ट्री' पूर्ण केली. ती होताच माझ्या पतीने माझ्या वडिलांना उचलून आमच्या तमाशाच्या राहुटीत आणून झोपवले. आमची खूप तारांबळ उडाली. मागे राहुटीत हे सर्व सुरू असताना, रंगमंचावर आमच्या वगनाट्याचा प्रयोग मात्र सुरूच होता. वडिलांना दवाखान्यात नेणे आवश्यक होते. आमच्याकडे आमच्या तमाशाची जाहिरात करणारी जीप होती; पण ती नेमकी तेव्हा तिथे उपलब्ध नव्हती. आमची धावाधाव सुरू झाली. त्यावर उपाय म्हणून मग त्या यात्रेत कुणी डॉक्टर वगैरे आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही काही लोकांना सांगितले. एकीकडे हे सर्व सुरू होते आणि त्याचवेळी पुढे रंगमंचावर सुरू असलेल्या वगनाट्यात आमची 'एन्ट्री' होती. राजीव गांधी यांची हत्या जिने केली होती; तिची भूमिका त्या वगनाट्यात मी करत होते. आमचे शेवटचे दोन प्रसंग राहिले होते. प्रयोग होणे महत्त्वाचे होते आणि आम्ही तो रसिकांसमोर सादर करत होतो.
आम्ही तो प्रयोग एकदाचा पूर्ण केला. आमचा प्रयोग संपता संपता तिथे डॉक्टर येऊन पोहोचले होते. वडिलांची केवळ शुद्ध हरपली आहे, असेच आम्हाला तोपर्यंत वाटत होते. पण डॉक्टरांनी वडिलांना तपासले आणि आम्हाला सर्वकाही कळून चुकले. वडील बेशुद्ध झाले आहेत; असे आम्हाला वाटले असले, तरी आम्हाला काही वेळाने समजले की, माझ्या आईला तेव्हा वेगळेच काहीतरी जाणवले होते. तिच्या खांद्यावरच वडिलांनी प्राण सोडला होता. अगदी रंगमंचावर प्रयोग करत असताना वडील गेले; पण समोरच्या रसिकांना काहीच कळले नाही. त्यांना आम्ही ते कळू दिले नाही. माझे वडील नेहमी म्हणायचे की रंगमंचावर मरण यायला हवे आणि त्यांना अगदी तसेच मरण आले.
आमचा हा तमाशा सुरू होता, तो गुजरातच्या सीमेजवळ आणि वडिलांच्या अंत्यविधीसाठी मात्र आम्हाला जावे लागणार होते, ते सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या रोपळे या गावी...! अर्थातच, प्रवास मोठा होता. तिथे पोहोचायला साधारण १८ तास तरी लागणार होते. आता प्रवास करायचा कसा, असा आमच्यापुढे प्रश्न होता. कारण आमच्याकडे आमची जीप नव्हती. आमच्या फडाच्या शेजारी अजून एका मंडळींच्या तमाशाचा फड लागला होता. त्यांची जीप आम्ही घेतली आणि वडिलांचे पार्थिव जीपमध्ये ठेवले. आम्ही तिथून रात्री प्रवास सुरू केला आणि दुसऱ्या दिवशी थेट रात्री एक वाजण्याच्या सुमारास आम्ही रोपळे गावी पोहोचलो. त्या रात्री आम्ही वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही नांदेड जिल्ह्यात भरणाऱ्या यात्रेसाठी पोहोचलो. तिथेही प्रयोग करायचा होता. आता आम्हाला प्रश्न पडला की, अशा स्थितीत काम करायचे तरी कसे? एकीकडे वडील गेल्याचे दुःख होते आणि दुसरीकडे आईला सांभाळायचे होते. रडून रडून तर आम्हा दोघी बहिणींचे डोळे सुजले होते. प्रयोगाच्या दरम्यान डोळ्यांवरची सूज दिसू नये म्हणून मग आम्ही काळे चष्मे घातले आणि तो कार्यक्रम केला. नांदेडची ही यात्रा दहा दिवस होती. दहा दिवस तिथे कार्यक्रम करून आम्ही वडिलांचे दहावे करण्यासाठी पुन्हा गावी आलो आणि त्यांचे दहावे करून आम्ही पुन्हा तमाशाच्या मुक्कामी जाऊन पोहोचलो...!