धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे. जवळपास ७० हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक त्यांनी पूर्णतः बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. या नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह एकूण १३ प्रभागांतील सर्व २६ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १९५२ साली स्थापन झालेल्या दोंडाईचा नगरपरिषदेच्या इतिहासात ही निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे. हे भाजपचे १००% बिनविरोध यश मंत्री जयकुमार रावल यांच्या राजकीय कौशल्याची पोचपावती मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपसमोर शिवसेना (उबाठा गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट), एम.आय.एम., समाजवादी पार्टी आणि अनेक अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केले होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वच विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सामुहिक प्रयत्नांमुळे ही सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली असून, यामुळे भाजपचे संघटन बळ पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे धुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर भाजपची पकड आणखी मजबूत झाली आहे.
प्रतिनिधी: सरकारने १९३० पासून पुढे सुरू असलेल्या कामगार कायद्यात बदल केले आहेत. त्यामुळे नव्या विस्तृत मांडणीसह काही नवे कायदे व काही जुन्या कायद्यात ...
रावल यांनी ४० वर्षांचा तिढा सोडवला
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांना जे यश मिळाले आहे, त्यामागे त्यांची कुशल राजकीय रणनीती (Masterstroke Strategy) आणि दोन गटांना एकत्र आणण्याचे कौशल्य कारणीभूत ठरले आहे. या विजयातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे दोंडाईचा नगरपरिषदेत गेली चार दशके भाजपचा कट्टर विरोधक मानला जाणारा डॉ. हेमंत देशमुख यांचा गट भाजपमध्ये सामील करण्यात मंत्री रावल यांना यश आले. रावल यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाच्या उच्चस्तरीय नेत्यांच्या चर्चेनंतर हा ऐतिहासिक राजकीय तिढा अखेर सुटला. या महत्त्वपूर्ण बदलामुळे दोंडाईचातील दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष संपुष्टात आला. डॉ. देशमुख गटाला भाजपवासी केल्यानंतर, मंत्री रावल यांनी रणनिती आखून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने पाऊल उचलले. सुरुवातीलाच नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल यांच्यासह ७ जागा बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळाले. त्यानंतर माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित सर्व १९ जागांवरही भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामुळे दोंडाईचा नगरपरिषदेची निवडणूक प्रथमच पूर्णतः बिनविरोध पार पडली आणि भाजपची 'बिनविरोध सेंच्युरी' मजबूत झाली. जयकुमार रावल यांच्या या नेतृत्वाने राजकीय स्थैर्य आणि बिनविरोध निवडणूक प्रक्रियेचा मजबूत पाया घातल्याचे बोलले जात आहे.
रावल यांचा करिष्मा की महाविकास आघाडीची माघार?
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषदेची निवडणूक मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली असली तरी, या अभूतपूर्व यशामागे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली आहे. एका बाजूला मंत्री रावल यांच्या राजकीय कौशल्याचा करिष्मा दिसत असला तरी, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसह (MVA) सर्व विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. सर्वांत मोठा प्रश्न असा आहे की, मंत्री जयकुमार रावल यांनी अशी नेमकी कोणती राजकीय समीकरणे फिरवली, ज्यामुळे महाविकास आघाडीतील पक्ष (शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) तसेच एमआयएम आणि समाजवादी पार्टीसारख्या सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना शेवटच्या क्षणी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले? विरोधी पक्षांचा दबाव कमी? एकीकडे डॉ. हेमंत देशमुख यांच्या कट्टर विरोधी गटाला भाजपमध्ये सामील करून रावल यांनी जुना संघर्ष संपवला. पण दुसरीकडे, स्थानिक पातळीवर मजबूत मानले जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी एकत्रितपणे लढण्याऐवजी अर्ज मागे घेण्याचा निर्णय का घेतला? राजकीय जाणकारांच्या मते, रावल यांनी केवळ सामंजस्य करारच नाही, तर प्रभावी राजकीय दबावतंत्राचा वापर केला असावा, ज्यामुळे विरोधकांना बिनविरोध प्रक्रियेत सहभागी होणे भाग पडले.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास रचला असून, नगराध्यक्षांसह सर्व २६ जागांवर आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपला हे ऐतिहासिक १००% यश मिळाले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, नगराध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री श्रीमती सी. नयनकुंवरताई रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोंडाईचा नगरपरिषदेच्या १३ प्रभागातून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
नगराध्यक्षा पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई सी. नयनकुंवरताई रावल, प्रभाग क्र.१ मध्ये मुकेश गणसिंग देवरे, रविना महेशकुमार कुकरेजा, प्रभाग क्र.२ मध्ये सरलाबाई छोटू सोनवणे व शेख शिबान अहमद रियाज अहमद, प्रभाग क्र.३ मध्ये अक्षय वसंत चव्हाण, सुपौयाबी मेहमुद बागवान, प्रभाग क्र.४ मध्ये कल्पनाबाई गोपाल नगराळे, पिंजारी शेख नबु शेख बशिर, प्रभाग क्र.५ मध्येविजय जिजाबराव पाटील व भारती विजय मराठे, प्रभाग क्र.६ मध्ये वैशाली शरद कागणे व सुभाष कांतीलाल धनगर, प्रभाग क्र.७ मध्ये देवयानी संजोग रामोळे व चतूर जिभाऊ पाटील, प्रभाग क्र.८ मध्ये नरेंद्र नथ्थुसिंग गिरासे व राणी राकेश अग्रवाल, प्रभाग क्र.९ मध्ये वैशाली प्रवीण महाजन व निखीलकुमार रविंद्रसिंग जाधव, प्रभाग क्र.१० मध्ये अपूर्वा चिरंजीवी चौधरी व जितेंद्र धनसिंग गिरासे, प्रभाग क्र.११ मध्ये भावना हितेंद्र महाले व रविंद्र भास्कर देशमुख, प्रभाग क्र.१२ मध्ये सरजू वेडू भिल व सुवर्णा युवराज बागुल, प्रभाग क्र.१३ मध्ये भरतरी पुंडलिक ठाकुर व ललिता जितेंद्र गिरासे आदी नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडुन आले आहेत.






