Saturday, November 22, 2025

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, काहीजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही क्रुझर जीप सोलापूरहून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाली होती. क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद (Solapur Hyderabad Highway) महामार्गावरून जात असताना, धाराशिवमधील (Dharashiv news) अणदूर परिसरामध्ये त्यांच्या जीपचे टायर्स अचानक फुटले. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या या जीपने एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती रस्त्यावर पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय गाडीतील इतर काही प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टायर्स फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे हे या भीषण अपघाताचे प्राथमिक कारण मानले जात आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांवर काळाने घाला घातल्याने अणदूर आणि सोलापूर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

भीषण अपघातात तीन महिलांसह ५ जणांचा मृत्यू

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिवजवळ झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सोलापूरहून नळदुर्ग येथील देवदर्शनासाठी निघालेली ही क्रुझर जीप टायर्स फुटल्यामुळे अनियंत्रित झाली आणि तिने रस्त्यावरील एका ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, क्रुझर गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघाताच्या वेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून बसवले होते, ज्यामुळे अपघाताची तीव्रता वाढली आणि जीवितहानी अधिक झाली. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी जीवावर उदार होऊन जोर लावून क्रुझर गाडी सरळ केली आणि आत अडकलेले मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. अपघातातील सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत आणि जखमी झालेले सर्व प्रवासी हे दक्षिण उळे सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समजते. सध्या अपघातस्थळी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि पंचनामा सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने झालेली ही मोठी दुर्घटना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >