मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील भायखळा विधानसभेत उबाठाचे मनोज जामसूतकर हे आमदार म्हणून निवडून आले. लोकसभा निवडणुकीत भायखळा विधानसभेत जेवढी मते उबाठाला मिळाली तेवढीच मते उबाठाने कायम राखण्याचा प्रयत्न केला. परंतु या विधानसभा क्षेत्रात लोकसभेच्या तुलनेत आठ हजार मतांशिवाय शिवसेनेच्या उमेदवाराला मतांची आकडेवारी वाढवता आलेली नाही. त्यामुळे भायखळा विधानसभेत प्रभाग आरक्षणानंतर तीन प्रभागांचे आरक्षण कायम राखले गेले. त्यात उबाठाच्या दोन विद्यमान नगरसेवक आणि अभासेच्या एक नगरसेवकाचा समावेश आहे.
भायखळा विधानसभेत सहा नगरसेवक असून त्यात भाजपाचा एक, शिवसेनेचा एक, उबाठाचे दोन, अभासेचा एक आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाचा समावेश आहे. त्यातील उबाठाचे विद्यमान नगरसेवक रमाकांत रहाटे आणि सोनम जामसूतकर यांचे प्रभाग सुरक्षित राहिले आहे, तर अभासेच्या गीता गवळी यांचाही प्रभाग सुरक्षित झाला आहेे. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच प्रभाग खुला झाला असला तरी ते आमदार असल्याने समाजवादी पक्षांतच मोठी स्पर्धा आहे. तर प्रभाग २१०मध्ये उबाठाच्या सोनम जामसूतकर यांचा प्रभाग झाल्याने माजी नगरसेवक आणि उपनेते राम सावंत यांनी इच्छा प्रकट केली आहे.त्यामुळे तसे झाल्यास सोनम जामसूतकर यांना प्रभाग २०९मध्ये जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर प्रभाग क्रमांक २०८ हा मनसेचा बालेकिल्ला असला तरी उबाठाचे विद्यमान नगसेवक असल्याने जागा वाटपात मनसेला हा प्रभाग सोडणे शक्य नाही, त्याऐवजी मनसेला प्रभाग २०९ सोडला जाण्याची शक्यता आहे. पण युती न झाल्यास मनसेला सहा पैंकी चार ते पाच जागांवर उमेदवार उभा करता येईल.
लोकसभेतील भायखळा विधानसभेतील मतदान
अरविंद सावंत(उबाठा) : ८६,८८३
यामिनी जाधव(शिवसेना) : ४०,८१४
भायखळा विधानसभा निकाल
मनोज जामसूतकर (उबाठा) : ८०,१३३
यामिनी जाधव (शिवसेना) : ४८,७७२
प्रभाग २०७ (खुला प्रवर्ग)
या प्रभागातून भाजपाच्या लोखंडे या प्रथमच निवडून आल्य होत्या. परंतु आता प्रभाग सर्वसाधारण खुला झाल्याने रोहिदास लोखंड यांच्यासाठी हा प्रभाग अनुकूल झाला आहे. त्यामुळे या प्रभागावर भाजपाची दावेदारी असल्याने भाजपाचे रोहिदास लोखंडे यांच्यासह युवा मोर्चाचे कमलेश डोके यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे. तर उबाठाकडून काका चव्हाण तर अभासेकडून योगिता गवळी यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेसकडून समीर चव्हाण यांचेही नाव चर्चेत आहे.
प्रभाग २०८ (ओबीसी)
हा प्रभाग आधी खुला होता, पण आता ओबीसी झाल्याने विद्यमान उबाठाचे नगरसेवक रमाकांत रहाटे हे सेफ झोनमध्ये आहेत. रहाटे ओबीसी असल्याने उबाठाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जातअसली तरी अॅड मंगेश बनसोड यांचेही नाव चर्चेत आहे. तर या प्रभागातून शिवसेनेचे विजय लिपारे तर भाजपाकडून विजय बनकर आणि मनसेकडून किरण टाकळे, अमोल लोगे यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. परंतु युती न झाल्यास हा प्रभाग उबाठाला आणि महायुतील शिवसेनेला सोडला जावू शकतो. त्यामुळे या प्रभागात उबाठा आणि शिवसेना थेट लढत होईल.
प्रभाग २०९ (महिला)
हा प्रभाग खुला असला तरी आगामी निवडणुकीत तो महिला राखीव झाल्याने विद्यमान नगरसेवक आणि शिवसेनेचे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने या प्रभागात माजी आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर उबाठाकडून शाखाप्रमुख लिंगाप्पा यांची पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. तर मनसेला हा प्रभाग सोडल्यास माजी नगरसेविका समिता नाईक यांना या प्रभागात उतरावे लागणार आहे अशी चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक २१० (खुला )
हा प्रभाग यापूर्वी अनुसूचित जातीकरता महिला करता आरक्षित होता. त्यामुळे काँग्रेसच्या तिकीटावर लढलेल्या परंतु आता उबाठामध्ये असलेल्या सोनम मनोज जामसूतकर या नगरसेविका आहेत. त्यामुळे उबाठाकडून सोनम जामसूतकर यांच्या नावाची चर्चा असली तरी प्रभाग खुला झाल्याने माजी नगरसेवक राम सावंत हेही इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवसेनेच्यावतीने संतोष राणे यांच्या नावाची चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक २११(खुला)
हा प्रभाग ओबीसी होता, पण आता खुला प्रवर्गकरता राखीव झाला आहे. याठिकाणी समाजवादी पक्षाचे रईस शेख हे नगरसेवक होते.परंतु ते आमदार बनल्याने या या प्रभागात समाजवादी पक्षाकडून मोठी यादी आहे.ज्यात नदीम सिद्दीकी, आलाद युसुफ अब्राहनी आणि फैय्याज अहमद यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून जावेद जुनेजा आणि उबाठाकडून पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेच्यावतीने यशवंत जाधव हेही या प्रभागासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक २१२(महिला)
हा प्रभाग महिला राखीव होता, पुन्हा एकदा तो महिला राखीव झाला आहे. त्यामुळे अभासेच्या गीता गवळी या सुरक्षित क्षेत्रात आहे. काँग्रेसकडून पुन्हा नाझिया मोहम्मद आशफाक सिद्दीकी आणि शिवसेना उबाठाच्या शाखाध्यक्षा सोनल सायगावकर यांच्या नावाची चर्चा आहे,मात्र गीता गवळी यांचे सातत्यपूर्ण कामामुळे या विभागात दोन्ही पक्षाची झलक दिसून येत नाही, त्यात महिला आरक्षित झाल्या या दोन्ही पक्षांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येत आहे.






