Thursday, November 20, 2025

द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व पंत की राहुलकडे?

द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व पंत की राहुलकडे?

दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिलवर टांगती तलवार

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका निर्णायक टप्प्यावर असतानाच, उभय संघांमधील तीन सामन्यांच्या बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय येत्या २३ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत भारतीय संघाची घोषणा करू शकते.

सध्या भारतीय कसोटी आणि वन-डे संघाचे नेतृत्व युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे आहे. पण मानेच्या दुखापतीमुळे त्याच्या वन-डे मालिकेतील सहभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात गिलच्या मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला त्याच सामन्यातून माघार घ्यावी लागली.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ गुवाहाटीत दाखल झाला आहे. कर्णधार गिल पहिल्या कसोटीवेळी रुग्णालयात होता. तसेच हाती आलेल्या वृत्तानुसार, गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे गिलच्या दुखापतीची नेमकी तीव्रता स्पष्ट झालेली नाही. असे असले तरी, गिल हा भारतीय क्रिकेटचे 'लॉन्ग टर्म' भविष्य मानले जात असल्याने, त्याला अनफिट अवस्थेत मैदानात उतरवणे बीसीसीआयसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे, गिल आगामी वनडे मालिकेतूनही बाहेर राहण्याची दाट शक्यता आहे.

२३ नोव्हेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा? : फिट नसलेल्या गिलला खेळवणे संघासाठी आणि त्याच्यासाठीही धोकादायक ठरू शकते,’ असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयकडे राहुल आणि ऋषभ पंत हे दोन पर्याय कर्णधारपदासाठी आहे असे मानले जात आहे. राहुलने मागील काळात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तर युवा आणि आक्रमक कर्णधार म्हणून पंचीची ओळख आहे. जर गिल मालिकेतून बाहेर राहिला, तर या दोघांपैकी एकाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

दुसरा कसोटी सामना भारतासाठी महत्वाचा : भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघाला जर मालिका बरोबरीत आणायची असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिकंणे अतिशय महत्वाचे असणार आहे. कोलकाता कसोटीत पराभव झाल्यानंतर मंगळवारी भारतीय खेळाडूंनी ईडन गार्डन्सच्या मैदानावर सराव केला. त्यावेळी ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा आणि आकाशदीप हे खेळाडू सराव करताना दिसले. आता दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ पुनरागमन करणार का? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.'

गुवाहाटीच्या खेळपट्टीची पहिली झलक : सामन्याच्या ४८ तास आधी गुवाहाटीच्या खेळपट्टीची पहिली झलक समोर आला होती. सध्या तरी मधल्या भागात दाट गवत आहे. त्याचबरोबर सामन्यासाठी शक्यतो लाल मातीतील खेळपट्टीच असण्याची शक्यता आहे. लाल मातीतील खेळपट्टी ही वेग आणि उसळीसाठी प्रसिद्ध असते. काळ्या मातीतील खेळपट्टीसारखी ही खेळपट्टी फुटत नाही. मात्र याचा अर्थ ती फिरकीला साथ देणार नाही असे नाही. जर खेळपट्टीवर जास्त गवत ठेवलं तर जसजशी कसोटी पुढे सरकेल तसतसे भारतीय फिरकीपटू सामन्यावर अधिराज्य गाजवू शकतील.

Comments
Add Comment