मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपली आहे. अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडक जागांवर उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. बिनविरोध विजयी झालेल्यांमध्ये प्रामुख्याने नेत्यांचे नातलग आणि त्यांचे विश्वासू असलेले उमेदवार यांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुदत संपण्याआधीच सर्व विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे तिथे स्थानिक सत्ताधारी गटाच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. चला तर मग, राज्यातील कोणत्या ठिकाणी किती उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
अमरावतीची चिखलदरा नगरपालिका, सोलापुरातील अनगर नगरपंचायत आणि जामनेर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये भाजपची ताकद दिसली. अमरावतीच्या चिखलदऱ्यात निवडणूक चुरशीची होईल असं वाटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून नऊ उमेदवार उभे होते. त्यात काँग्रेसचेही उमेदवार होते. पण आयत्यावेळी विकासाला प्राधान्य देत विरोधकांनी माघार घेतल्यामुळे आल्हाद कलोती यांचा बिनविरोध विजय झाला. ते नगरसेवक झाले. हा विजय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावरील विश्वास असल्याची प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. ही राज्यातील पहिलीच नगरपालिका निवडणूक ठरली जिथे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाला थेट बिनविरोध यश मिळालं. दुसरीकडे सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत सर्वच्या सर्व १७ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील रिंगणात होती. पण राष्ट्रवादीच्या उज्ज्वला पाटील यांचा अर्ज बाद झाला आणि प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या. अनगर नगरपंचायतीने सलग ५० वर्ष बिनविरोधची परंपरा कायम राखली. जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांचा डाव यशस्वी झाला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन या सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आल्या आणि जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष झाल्या. त्यांनी बिनविरोध जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष होण्याची हॅटट्रिक साधली. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेच्या तिन्ही उमेदवार मयूरी चव्हाण, अनिल चौधरी, रेशंता सोनवणे यांनी माघार घेत भाजपमध्येच प्रवेश केला. भाजपचे तीन ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. भुसावळ येथे वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ (ब) मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध निवडून आल्या. शेवटच्या दिवशी नगरपालिकेत भाजपचे १० नगरसेवक बिनविरोध विजयी झाले.
रायगडच्या पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भाग क्र. ११ अ मधून मालती तुकाराम म्हात्रे (भाजप), प्रभाग क्रमांक ११ ब मधून स्मिता दयान पेणकर (भाजप), प्रभाग क्रमांक १२ ब मधून अभिराज रमेश कडू(भाजप) तर प्रभाग क्रमांक १२ अ मधून सुशीला हरिच्छंद्र ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग क्रमांक ९ मधून वसुधा तुकाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्रमांक ५ मधून दीपक जयवंत गुरव(राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे बिनविरोध विजयी झाल्या. परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवार रेश्मा बळवंत या बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेच्या जयश्री गीते बिनविरोध विजयी झाल्या. बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेत नगराध्यक्षसह भाजपच्या २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. राजगुरुनगर नगरपरिषदेत शिवसेनेच्या सुप्रिया पिंगळे यांना बिनविरोध विजय झाला.






