Thursday, November 20, 2025

पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या सदनिका सोडतीच्या अर्जाची मुदत वाढली

पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या सदनिका सोडतीच्या अर्जाची मुदत वाढली

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत करण्यात येणार आहे. सदनिकांची सोडत ११ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात येणार आहे. या योजनेला पुणेकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिल्यामुळे अधिक इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, पुणेकरांना किंवा पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आणखी एक संधी मिळाली आहे.

पुण्यातील ४१८६ सदनिकांसाठी आतापर्यंत अंदाजे दोन लाखापर्यंत अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सव्वा लाख अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन सोडत  दिनांक ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. तर ०१ डिसेंबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम अर्जदारांना भरता येणार आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अडचणी आली. तसेच अनेक नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी अडचण येत होती म्हणून आणखी काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याविषयी मागणी करण्यात येत होती. नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इतर मजकुर पुर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत १६८३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २९९ सदनिका, १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ८६४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३२२२ सदनिकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा