Friday, November 21, 2025

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुवाहाटी येथे शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. याआधी कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. यामुळे गुवाहाटी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे मोठे आव्हान भारतापुढे आहे. मालिका वाचवण्यासाठी भारताला कामगिरी सुधारावी लागणार आहे.

गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला जाईल. सकाळी नऊ वाजल्यापासून हा सामना सुरू होणार आहे. बारसापारा स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना होतो आहे. येथील खेळपट्टी अनोळखी आहे. यामुळे इथे गोलंदाजांना साथ मिळणार की फलंदाजांना याचा अंदाज करणे सध्या कठीण आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे गुवाहाटी कसोटी खेळणार नाही. तो उपचारासाठी मुंबईला गेला आहे. गिलच्या अनुपस्थितीत रिषभ पंत कर्णधारपद सांभाळणार आहे. दुसरीकडे पाहुण्या द. आफ्रिका संघालाही धक्का बसला आहे. त्यांचा हुकमी गोलंदाज कागिसो रबाडा बरगडीला दुखापत झाल्याने या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी लुंगी एनगिडीचा संघात समावेश करण्यात आला. विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेला गेल्या तीन मालिकांमधील भारताचा हा दुसरा मालिका पराभव करण्याची संधी आहे, तर भारताला मालिका वाचवण्यासाठी ही कसोटी जिंकणे आवश्यक आहे.

मायदेशातली प्रत्येक कसोटी मालिका जिंकणारा भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध हरला. यामुळे १२ वर्षांपासूनची विजयाची परंपरा पहिल्यांदाच थांबली. आता गुवाहाटी कसोटीत कामगिरी सुधारली नाही तर भारतावर पुन्हा एकदा कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की येणार आहे. कोलकाता येथे कागिसो रबाडा नसतानाही मार्को जॅन्सेन आणि अनुभवी सायमन हार्मेर यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताला रोखले होते. यामुळे गुवाहाटीत भारतापुढे दक्षिण आफ्रिकेचे मोठे आव्हान असेल असे मत क्रीडा अभ्यासक व्यक्त करत आहे.

नियमित कर्णधार शुभमन गिल याच्या गैरहजेरीत कसोटीत अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत भारताचे नेतृत्व करणार आहे. पंत हा गेल्या १२ महिन्यांत भारताचे नेतृत्व करणारा चौथा कर्णधार असेल. संघात सहा डावखुरे फलंदाज असल्यामुळे हार्मेरचा धोका लक्षात घेता, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी किंवा बी साई सुदर्शन यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकीपटूंमध्ये अक्षर पटेल बाहेर राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर पडला आहे. यामुळे, जॅन्सेन आणि कॉर्बिन बॉश यांचे स्थान निश्चित झाले आहे.

गुवाहाटीची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजीला नंतर फिरकी गोलंदाजीला पोषक असेल असे काही क्रीडा अभ्यासकांचे मत आहे. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर होत असलेला सामना हा या मैदानावरील पहिला कसोटी सामना आहे. या निमित्ताने ही जागा हे भारताचे तिसावे आणि जगाचे १२४ वे कसोटी सामन्याचे मैदान आहे. हे स्टेडियम २०१२ मध्ये पूर्ण झाले आणि २०१७ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० सामना खेळवण्यात आला होता. भारतीय संघाने आतापर्यंत तेथे चार टी-२० आंतरराष्ट्रीय आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.

संभाव्य संघ

भारतीय संघ : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन,रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, केशव महाराज, मार्को यान्सन, कॉर्बिन बॉश.

Comments
Add Comment