Friday, November 21, 2025

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबईत एअर शो दरम्यान LCA तेजस विमान कोसळले, विंग कमांडर नमांश स्यालचा मृत्यू

दुबई : दुबई एअर शो दरम्यान शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे एलसीए तेजस विमान कोसळले. या अपघातात विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. विमान कोसळेपर्यंत त्यांनी इजेक्ट केले नव्हते. नमांश स्याल यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी कांगडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या अधिकाऱ्याला श्रद्धांजली वाहिली. याआधी एक इंजिन असलेले एलसीए तेजस विमान दुबई एअर शो दरम्यान दुपारी कोसळले. लूप मॅन्युव्हर पूर्ण केल्यानंतर पुन्हा विशिष्ट उंची गाठणे आवश्यक असते. पण अचानक उंची गमावल्यानंतर अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात हे विमान कोसळले.

अपघात प्रकरणी भारतीय हवाई दलाने नियमानुसार चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच हवाई दलाने प्रसिद्धीपत्रक काढून अपघाताची थोडक्यात माहिती दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही विंग कमांडर नमांश स्याल यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच शोक प्रकट केला आणि अपघात प्रकरणी नियमानुसार चौकशी होणार असल्याची माहिती दिली. सध्या भारत वापरत असलेल्या एलसीए तेजस विमानांसाठी अमेरिकेचे इंजिन वापरले जाते. यामुळे कोसळलेल्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता की आणखी काही समस्या निर्माण झाली होती याचा तपास सुरू आहे.

आतापर्यंत एलसीए तेजस विमानाचे दोन अपघात झाले आहेत. मार्च २०२४ मध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथे एलसीए तेजस विमान कोसळले होते. पण त्यावेळी वैमानिक इजेक्ट करू शकल्यामुळे सुरक्षित राहिला होता. यानंतर थेट दुबईत एलसीए तेजस विमान कोसळले.

Comments
Add Comment