‘नमस्कार’ हा शब्द उच्चारताच मनात एक ऊबदार भावना निर्माण होते. समोरच्या व्यक्तीला मान देणे, त्याच्याशी संवादाची पहिली पायरी टाकणे आणि सामाजिक नात्यांची विण घट्ट करण्याची प्रक्रिया याची सुरुवात या छोट्याशा शब्दातून होते. म्हणूनच २१ नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक नमस्कार दिन’ (World Hello Day) म्हणून जगभर पाळला जातो. १९७३ मध्ये इजिप्त आणि इस्रायल दरम्यान झालेल्या युद्धानंतर शांततेचा संदेश देण्यासाठी या दिवसाची निर्मिती झाली.
१८० हून अधिक देश हा दिवस पाळतात. नमस्कार हा केवळ अभिवादनाचा शब्द नाही; तो सामाजिक व्यवहारातील सभ्यता, नम्रता आणि परस्पर आदराचे प्रतीक आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास ‘नमस्कार’ म्हणजे मानवसंस्कृतीचा मूलभूत पाया होय. मानवी संबंध, सामाजिक भांडवल, सांस्कृतिक मूल्ये आणि शांततामय सहजीवनाची तत्त्वे यांची सांगड ‘नमस्कार’ या एका छोट्याशा कृतीतून दिसून येते.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, संवादाच्या असंख्य साधनांची उपलब्धता असली तरी मानवी नात्यांतील ऊब, आदर आणि संवेदनशीलतेचे स्थान धोक्यात येताना दिसते. व्हर्च्युअल संवाद वाढल्याने ‘हॅलो’, ‘हाय’ अशी इंग्रजी स्वरूपातील अभिवादने प्रचलित झाली; परंतु भारतीय ‘नमस्कार’ या संकल्पनेतील सांस्कृतिक खोली आजही अधिक प्रभावी आहे. भारतीय समाजात अभिवादन हा एक संस्कार मानला जातो. वडीलधाऱ्यांना वंदन करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, रस्त्यावर भेटलेल्या व्यक्तीला नम्रपणे ‘नमस्कार’ म्हणणे ही कृती मनातील आदर जागवते. एखाद्या व्यक्तीला केलेला नमस्कार म्हणजे त्याच्या अस्तित्वाची पावती होय. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले असता ‘नमस्कार’ ही सामाजिक सलोखा, स्नेहभाव, समुदायभावना आणि नागरिकांमधील विश्वास वाढवणारी कृती आहे. आजचा काळ तंत्रज्ञानाने अवकाश कवेत घेतलेला काळ आहे. पण त्याच वेळी व्यक्तिगत एकाकीपण, तणाव, भीती, मानसिक आरोग्याशी संबंधित संकटे वाढत आहेत. मानसशास्त्र सांगते की, सर्वात छोटा सामाजिक संकेत जसे की स्मित, अभिवादन, नमस्कार ही कृती व्यक्तीला सामाजिक अस्तित्वाची जाण करून देते, आत्मविश्वास वाढवते आणि सकारात्मक ऊर्जा देते. म्हणून ‘नमस्कार’ ही संस्कृती केवळ आदराची खूण नसून मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही नमस्कार केल्यावर तो क्षण एक प्रकारची सुरक्षितता निर्माण करतो. अनोळखी लोकांमधील संवादाची सुरुवात तणाव कमी करते आणि सामाजिक विश्वास वाढवते. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये, शासकीय कार्यालयांत किंवा गावपातळीवरील सामूहिक जगामध्ये अभिवादन संस्कृती वाढवणे म्हणजे सामाजिक सकारात्मकतेचा पाया मजबूत करणे होय.
समाजशास्त्रामध्ये अभिवादनाला ‘प्रतीकात्मक आंतरक्रीयावाद’ याच्या मुळाशी सामावलेले मानले जाते. प्रत्येक व्यक्ती स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलची धारणा निर्माण करताना या प्रतीकात्मक कृतींचा आधार घेतो. ‘नमस्कार’ हा केवळ हात जोडणे किंवा शब्द उच्चारणे नाही; तो आपल्या संस्कारांचे, मूल्यांचे आणि सामाजिक ओळखीचे प्रतीक आहे. एका व्यक्तीचा नमस्कार दुसऱ्यात आदर, स्वीकार आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो. यामुळे सामाजिक नातेसंबंध दृढ होतात. परिणामी समाजातील तणाव घटतो, स्पर्धा आणि संघर्षाच्या वातावरणात मानवी संवेदना टिकून राहतात. जागतिक नमस्कार दिनाचा मुख्य संदेश हा जगातील शांतता, सौहार्द, संवाद आणि सामोपचार टिकवण्याचा आहे. आज जेव्हा देशांमध्ये राजकीय तणाव, सांस्कृतिक संघर्ष, धार्मिक मतभेद, हिंसा आणि डिजिटल दरी वाढत आहे, तेव्हा ‘हॅलो’ किंवा ‘नमस्कार’ हा शब्द छोटा असला तरी त्यामागील विचार मोठा आहे, तो म्हणजे संवादाद्वारे तणाव कमी करणं. इतिहास सांगतो की युद्ध, संघर्ष आणि कटुता हे गैरसमजातून वाढतात. संवादाची पहिली पायरी म्हणजे अभिवादन होय. त्यामुळे जागतिक नमस्कार दिन हा शांततेच्या प्रक्रियेतील एक प्रतीकात्मक पाऊल आहे. भारतीय समाजात ‘नमस्कार’ दिन साजरा करण्याचे सामाजिक महत्त्व अधिक व्यापक आहे. नमस्कार म्हणजे संस्कृती टिकवण्याचा मार्ग आणि सामाजिक भांडवल वाढवण्याचे साधन आहे. आधीच्या पिढ्या सकाळी उठल्याक्षणी घरातील ज्येष्ठांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करायच्या. आजच्या पिढीत हे बंधन शिथिल झाले; परंतु अभिवादन संस्कृतीचे मूल्य आज अधिकाधिक महत्त्वाचे आहे. समाज माध्यमांवरील आभासी जगात ‘हाय’, ‘हॅलो’, ‘गुड मॉर्निंग’चे संदेश हजारो मिळतात, पण प्रत्यक्ष आयुष्यातील नमस्कार देणारा जवळचा माणूस नसल्यास त्या संबंधांचा ऊबदारपणा टिकत नाही. याच अानुषंगाने, या दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना अभिवादनाचे महत्त्व शिकवणे आवश्यक आहे. वर्गात प्रवेश करताना शिक्षकाला नमस्कार करणे, मित्रांना अभिवादन करणे, एकमेकांचा आदर राखणे, ही छोटी कृती मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित करते. आजची युवा पिढी तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती करत असली तरी सामाजिक कौशल्यांमध्ये घट जाणवते. मूलभूत संवादकौशल्य, सौजन्य, विनम्रता व परस्पर आदर या मूल्यांत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. नमस्कार हा केवळ परंपरा नाही, तर सामाजिक, भावनिक शिक्षणाचा मूलाधार आहे.
याहूनही महत्त्वाचे म्हणजे विविधतेने नटलेल्या भारतीय समाजात ‘नमस्कार’ ही कृती सर्वांना जोडणारा पूल आहे. भाषा, धर्म, जात, प्रदेश, वंश, आर्थिक विभाजन या सर्व भिंतींच्या पलीकडे ‘नमस्कार’ हा समान संस्कार आहे. महामार्गावर भेटलेला ट्रकचालक असो, सायकलवर जाणारा शेतकरी असो, उंच इमारतीत राहणारा व्यावसायिक असो किंवा गावातील वृद्ध महिला-पुरुष असो ‘नमस्कार’ हा शब्द सर्वांना सारखाच ऊबदार वाटतो. सामाजिक समता आणि परस्पर आदर टिकवण्यास ही कृती महत्त्वाची ठरते. आजच्या काळात संवादाच्या तुटलेल्या धाग्यांची जुळवाजुळव करणे ही मोठी गरज आहे. कुटुंबांमध्ये पिढ्यांमधील संवाद कमी झाला आहे, समाजात परस्पर अविश्वास वाढतो आहे, सार्वजनिक क्षेत्रात चिडचिड, आक्रमकता आणि असहिष्णुता वाढत आहे. पण या नकारात्मकतेत ‘नमस्कार’ हा छोटासा शब्द मनातला राग विरघळवतो, नव्या संवादाचे दार उघडतो आणि सामाजिक ऊबदारपणा निर्माण करतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या नमस्कार केल्याने हसरा चेहरा आणि नम्र आवाज मेंदूतील सकारात्मक हार्मोन्स सक्रिय करतात. त्यामुळे व्यक्तीचा मूड सुधारतो, तणाव कमी होतो आणि नात्यांमध्ये सौम्यता वाढते. जागतिक नमस्कार दिन हा केवळ औपचारिक दिन नाही; तो सामाजिक संवेदना, मानवता आणि परस्पर आदराचा उत्सव आहे. वाईट बातम्यांनी भरलेल्या जगात चांगल्या संवादाची, सकारात्मक सामाजिक वर्तणुकीची आणि मानवी मूल्यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. खरा संवाद ‘नमस्कार’पासूनच सुरू होतो. एखाद्या छोट्या अभिवादनानेही आपण एखाद्याच्या मनात आशेचा दिवा पेटवू शकतो. आज या दिवसाचे औचित्य साधून आपण आपल्या जीवनात खालील विचार दृढ करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला मान द्या, कोणालाही भेटताना अभिवादन करण्याची संस्कृती रुजवा, नात्यांमध्ये संवादाची दारे सतत उघडी ठेवा आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पसरवा. जागतिक नमस्कार दिन आपल्याला स्मरण करून देतो की, मोठा बदल करण्यासाठी मोठी भाषणे किंवा मोठी कृती आवश्यक नसते; कधी कधी एका साध्या ‘नमस्कार’मध्येही मानवतेचे सर्वात मोठे सामर्थ्य दडलेले असते. म्हणूनच आजच्या या जागतिक नमस्कार दिनी आपण सर्वांनी एकच संकल्प करूया की प्रत्येक दिवशी भेटलेल्या प्रत्येक व्यक्तींना मनापासून अभिवादन करायचे. ‘नमस्कार’ या शब्दात सामाजिक बंधुभावाचे, संस्कारांचे आणि शांततेचे बीज आहे. या बीजातूनच मानवतेचा वटवृक्ष उभा राहतो. नमस्कार म्हणजे फक्त अभिवादन नाही; तो मनुष्यत्वाचा उत्सव आहे.
- डॉ. राजेंद्र बगाटे






