संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख
देवरूख (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील सुपीक जमीन, सप्तलिंगी नदीचे पवित्र जल आणि स्थानिक शेतकऱ्यांची परंपरागत शेती कला यांच्या मिलाफातून निर्माण झालेला लाल भात आता एका नव्या ओळखीसह समोर येत आहे. ‘सप्तलिंगी लाल भात’ या नावाने हा औषधी, चविष्ट आणि पौष्टिक भात अधिकृतपणे ब्रँड केला जाणार असून, त्याला राष्ट्रीय स्तरावर नेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे तालुक्याच्या कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
ट्रेडर्स, कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चर या चार स्तंभांवर कार्य करणाऱ्या देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेने या ब्रँडच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. संगमेश्वर तालुका अॅग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी संकल्प प्राईड शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सक्रिय सहकार्यातून हा प्रकल्प साकारला जात आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि योग्य हवामानामुळे या भागातील लाल तांदळाला एक विशिष्ट नैसर्गिक सुगंध, चव आणि औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत. याच भौगोलिक वेगळेपणाचा उपयोग करून देवरूखची ही ओळख आता जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सप्तलिंगी लाल भात हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानला जातो. यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असल्याने तो रक्तवर्धक असून शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतो.
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय या उपक्रमामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला आता स्थिर बाजारपेठ आणि योग्य दर मिळणार असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. उत्पादन, गुणवत्ता आणि मार्केटिंग या तिन्हींची सांगड घालत संगमेश्वर तालुक्यातून एक मजबूत ग्रामीण औद्योगिक ब्रँड उभा राहत आहे. ‘सप्तलिंगी लाल भात’ केवळ तंदुरुस्तीपुरता मर्यादित नसून तो स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय ठरणार आहे. देवनगरी देवरुखची ही अनोखी नैसर्गिक देणगी आता आरोग्यासह अर्थव्यवस्थेचाही कणा बनणार असल्याचे दिसून येत आहे.






