मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यात बांधकाम व्यवसायातून कोट्यवधींची नियमित उलाढाल होते. यामुळेच झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बांधकाम व्यवसाय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्यांना धमकावणे, त्यांच्याकडे खंडणी मागणे अथवा त्यांचे अपहरण करुन सुटकेच्या बदल्यात पैसे मागणे हे प्रकार वाढू लागले आहेत. ताजी घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आहे. मुंबईच्या कांदिवलीत चारकोप परिसरात भरदिवसा फ्रेंडी दिलीमा भाई नावाच्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. अज्ञाताने फ्रेंडी दिलीमा भाईवर तीन राऊंड फायर केले. गोळीबारात फ्रेंडी दिलीमा भाई गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. शेतात पाठलाग करुन पोलिसांनी आरोपींना अटक केली.
कांदिवलीच्या चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार झाला. दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या. जखमी झालेल्या फ्रेंडी दिलीमा भाईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार करुन फरार झालेल्यांना अवघ्या काही दिवसांत शोधून काढले. गोळीबाराची घटना १९ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली आणि पोलिसांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतात पाठलाग करुन चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केली आहेत.
मुंबईतील कांदिवलीत राहणारा राजेश रमेश चौहान उर्फ दया (४२), पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये राहणारा सुभाष भिकाजी मोहिते (४४), पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये राहणारा मंगेश एकनाथ चौधरी (४०) आणि ठाणे जिल्ह्यातील काशीगावमध्ये राहणारा कृष्णा उर्फ रोशन बसंतकुमार सिंह (२५) या चौघांना पोलिसांनी कांदिवलीच्या चारकोप परिसरात फ्रेंडी दिलीमा भाईवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक केली आहे.