Thursday, November 20, 2025

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी असलेल्या 'जिप्सी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नुकतेच शशी खंदारे दिग्दर्शित जिप्सी सिनेमाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, चित्रपटाचे दिग्दर्शक शशी खंदारे, राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार कबीर खंदारे यांच्यासह जिप्सी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपट निर्मितीच्या प्रवासातील गमतीदार किस्से आणि राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास आदी गोष्टी मुलाखतीतून उलगडण्यात आल्या.

रसास्वाद मंडळाचा उपक्रम महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता यावे आणि नव्या पिढीने तयार केलेले उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत हा या मंडळाचा उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला किमान एक चित्रपट प्रेक्षकांना दाखवला जातो.

Comments
Add Comment