अलिबाग : अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आघाडीने विजयाचा गुलाल उधळला असून, भाजप, शिवसेना (शिंदे गट) युतीला पहिला धक्का दिला आहे. प्रभाग क्रमांक दोनमधून शेकापचे उमेदवार प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले आहेत.
प्रशांत नाईक यांच्यासमोर निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल केलेले भाजपचे संतोष साळुंखे यांनी गुरुवारी (दि.२०) आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले. यानंतर शेकाप कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन येथे जल्लोष करीत ॲड. प्रशांत नाईक यांचे अभिनंदन केले. अलिबाग नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २ डिसेंबर रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नगरपरिषद निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आघाडी व भाजप, शिवसेना (शिंदे गट) युती यामध्ये लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीने युतीला पहिला धक्का देत विजयाचा गुलाल उधळला. नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवरी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. गुरुवारी प्रभाग क्र. २ मधील भाजपचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले. यामुळे आघाडीकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविणारे ॲड. प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आल्यानंतर ॲड. प्रशांत नाईक यांचे आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक, नगरसेवक पदाच्या उमेदवार ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह इतर उमेदवार तसेच शेकाप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.