Thursday, November 20, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे १० नगरसेवक फुटणार ?

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे १० नगरसेवक फुटणार ?

भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याची शक्यता

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील संघर्ष काही दिवसांपासून तीव्र झाला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडाफोडीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आऊटगोईंगबाबत थेट केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. भाजपाने आपले लक्ष अजित पवार यांच्या हक्काच्या पिंपरी-चिंचवडकडे वळवले आहे. पार्थ पवार यांचे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झाली. भाजप शहरभर शत-प्रतिशत विजयश्री खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. शहरातील राष्ट्रवादीच्या जवळपास १० माजी नगरसेवकांशी भाजपच्या नेत्यांनी संपर्क साधला असल्याची माहिती समोर येत आहे.

जसजशा पालिका निवडणुका जवळ येत आहेत तसे राजकीय वातावरण तप्त होत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फोडाफोडीचे राजकारण प्रकर्षाने बघायला मिळत आहे. २०१७ मध्ये भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला होता तर राष्ट्रवादीला ३२ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले की, पालिकेत शत-प्रतिशत विजय मिळवण्यासाठी भाजप तयार आहे. अधिकाधिक सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांना पक्षात खेचण्याची रणनिती खेळली जात आहे. महायुती तुटल्यामुळे भाजपाकडून १२८ पैकी सर्व जागांवर उमेदवार देण्याचा पर्याय खुला मोकळा झाला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार असल्यामुळे या भागातील राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ३२ प्रभागांमध्ये तिकीटासाठी चढाओढ सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजप तुलनेने कमी पडते तिथे ‘ऑपरेशन कमळ’ खुलवण्याचा विचार सुरू आहे. कार्यकर्ते स्थानिक निष्ठावंतांना संधी द्यावी अशी मागणी करत आहेत. जर राष्ट्रवादीचे आयात केलेले नेते घेतल्यास पक्षातून नाराजी ओढवली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment