नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटात १५ लोक ठार व डझनहून अधिक जखमी झाले होते. या स्फोटात पाकिस्तानचाच हात आहे, अशी कबुली पाकव्याप्त काश्मीर विधानसभेत चौधरी अन्वरुल हक याने दिली आहे. दिल्लीतील कार बॉम्बस्फोट हा पाकिस्ताननेच घडविल्याचे हक याच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे.
विधानसभेत बोलताना चौधरी अन्वरुल हक म्हणाला की, मी आधीही म्हटले होते की, जर तुम्ही (भारताने) बलुचिस्तानला रक्तबंबाळ करणे सुरू ठेवले, तर आम्ही तुम्हाला लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत धडा शिकवू. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटापासून ते जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यापर्यंत भारताला लक्ष्य करणे हे पाकिस्तानने बदला म्हणून केलेले कृत्य होते. अल्लाहच्या कृपेने, आम्ही ते करून दाखवले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभेत चौधरी अन्वरुल हकने ओकली गरळ
पहलगाममधील हल्ल्याचाही केला उल्लेख : हकने पहलगाममधील एप्रिलमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. बलुचिस्तानमध्ये भारताच्या कथित हस्तक्षेपाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान भारतीय शहरांमध्ये हल्ले करत आहे, असा पोरकट आरोपही त्याने केला.






