मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अंधेरी रेल्वे स्टेशन लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा नवीन अड्डा झाला आहे' असा दावा करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासानंतर संपूर्ण प्रकरणाची खरी पार्श्वभूमी समोर आली असून व्हिडिओमध्ये केलेले दावे पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
काय होता नक्की व्हिडीओ
एका प्रवाशाने अंधेरी रेल्वे स्थानकावर एक मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आणि तिच्या बाजूला एक वयस्कर माणूस काही मंत्रोउच्चार सदृश करत असल्याचे व्हिडीओ यामध्ये दिसत आहे . आणि हेच दृश्य सोशल मीडियावर व्हायरल करून त्याचा धर्मांतराशी संबंध जोडण्यात आला. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला गेला, तो व्हायरल झाला आणि वातावरण तापले.
पोलिसांकडून तातडीची दाखल
व्हिडिओ व्हायरल होताच अंधेरी जीआरपी आणि आरपीएफने तत्काळ तपास सुरू केला. व्हिडिओतील दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्यात आला आणि काही तासांतच त्यांना ताब्यात घेऊन जबाब नोंदवण्यात आला.
तपासात काय समोर आले?
- मुलगी आणि वयस्कर पुरुष दोघांचाही कोणताही ख्रिश्चन धर्माशी संबंध नाही.
- दोघेही जैन हिंदू धर्मीय असून एकमेकांचे परिचित आहेत.
- वयस्कर नागरिक त्या मुलीला जपानी मेडिटेशन तंत्र शिकवत होते.
- त्यांच्या मते, हा कोणताही धार्मिक विधी नव्हता आणि धर्मांतराशी तर काहीही संबंध नव्हताच.
मुलीची पोलिसांकडे तक्रार
व्हिडिओला चुकीचा अर्थ लावून त्याचा प्रसार केल्याने आपली बदनामी होत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. तसेच, व्हिडिओ शूट करून खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत तिने अंधेरी जीआरपीकडे औपचारिक तक्रार दिली आहे.






