मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन वर्षांच्या निरागस बालिकेवर २४ वर्षीय व्यक्तीने अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांसह अनेक कलाकारांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मराठी अभिनेत्री सुरभी भावे हिने देखील सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला.
“अशी घटना मन हेलावून टाकणारी” सुरभी भावे
View this post on Instagram
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरभी म्हणते, “सकाळपासून मालेगावातील त्या छोट्याशा मुलीवर झालेल्या अत्याचाराची बातमी डोळ्यासमोरून जात नाहीये. म्हणे मुलीच्या वडिलांशी भांडण होतं म्हणून बदला घेण्यासाठी त्या विकृताने त्या बाळावर अत्याचार केला आणि तिचं आयुष्य हिरावून घेतलं… हे ऐकून मन सुन्न झालं.”
तिने पुढे कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटलं, “अशा विकृतांना वेळीच कडक शिक्षा मिळाली पाहिजे, नाहीतर पुढे कुणालाही धाक राहणार नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं घडलं असतं, तर त्या नराधमाचा चौरंग केला गेला असता.”
सुरभी पुढे म्हणाली, “मनापासून इच्छा आहे की, त्या माणसाला त्याच्या केलेल्या कृत्याची तडफड करूनच शिक्षा व्हावी. तो जिवंत राहण्यात काहीच अर्थ नाही. त्या निरागस बाळाला दिलेल्या वेदनांमुळे काय मिळालं त्याला? समजतच नाही. पण एक आई म्हणून विनंती करते की, या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर, फास्ट ट्रॅक नाही तर सुपर फास्ट ट्रॅकमध्ये, २४ ते ३६ तासांत लागला पाहिजे.” तिने संबंधित अधिकार्यांना त्वरित कारवाईची विनंती केली.
शेवटी सुरभी म्हणाली, “एखाद्या जीवाशी खेळणं इतकं सहज आहे असं कुणालाच वाटता कामा नये. त्या छोट्याशा बाळाला श्रद्धांजली देताना देखील मनाशी काळोख पसरतोय.”
व्हिडिओसोबत तिने कॅप्शन लिहिले, “यज्ञा बाळाला न्याय मिळायलाच हवा! हिंस्त्र प्रवृत्तीला थांबवलं नाही तर आपल्या लेकी-बाळी सुरक्षित राहणार नाहीत. ही बातमी पाहून मन फार व्यथित झालं…”






