Thursday, November 20, 2025

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला कंटाळून दिल्लीतील मेट्रो स्थानकावरून उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी शौर्यच्या शाळेतील प्राचार्यांसह तीन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शौर्य पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा रहिवासी होता. त्याचे वडील प्रदीप पाटील सोने-चांदी गाळण्याच्या व्यवसायानिमित्त कुटुंबासह अनेक वर्षांपासून दिल्लीतील राजीव नगर भागात राहतात. शौर्य इथल्या सेंट कोलंबस या शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता.१८ नोव्हेंबरला शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून खाली उडी मारली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्याला रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेमागील कारण

शौर्यच्या स्कूल बॅगमध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये त्याने स्पष्टपणे नमूद केले आहे की, तो अनेक दिवसांपासून शाळेतील काही शिक्षकांच्या मानसिक छळाला, अपमानाला आणि दबावाला कंटाळला होता. नोटमध्ये त्याने आपले नाव, पालकांना दिलगिरी, तसेच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या आत्महत्येसाठी त्याने संपूर्णत: शिक्षकांना दोषी ठरवले आहे.

या नोटच्या आधारावर पोलिसांनी सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल, तसेच शिक्षक मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली वर्गीस यांच्यावर मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेदरम्यान शौर्यचे वडील गावाकडे गेले होते. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. शौर्यचा अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी ढवळेश्वर येथे करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment