Wednesday, November 19, 2025

ज्ञानाचे मर्म

ज्ञानाचे मर्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै 

सगळ्या ठिकाणी ज्ञान हे कार्य करते व त्याच्याच वापरांतून प्रयोगांतून मिळणारे परिणाम हे चांगले किंवा वाईट ठरतात. म्हणजेच ज्ञान नाही, तर त्याचे प्रात्यक्षिक हे चांगले अथवा वाईट ठरवणारा निर्धारक घटक आहे. उदाहरणार्थ काळा पैसा असे म्हटले जाते मात्र प्रत्यक्षात हा पैसा काळाही नसतो व गोराही नसतो. पण पैशाचा वापर करणारे तो काळा की गोरा हे ठरवत असतात. काळा धंदा वा काळा व्यवसाय करणारे जे आहेत त्यांच्याकडचा पैसा तो काळा पैसा. त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळतो आहे आणि त्यामुळे आपला सगळा देश गुदमरतो आहे. हा भ्रष्टाचार जितक्या लवकर नष्ट होईल तेवढे आपण लवकर सुखी होऊ. सांगायचा मुद्दा भ्रष्टाचार करणाऱ्यांकडे ज्ञानच आहे व भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणाऱ्यांकडे ज्ञानच आहे, म्हणजेच जीवनविद्या जेव्हा ‘देतो तो देव’ असे म्हणते तेव्हा चांगले देतो तेव्हा तो देव व तोच जेव्हा दुःख देतो तेव्हा तो सैतान. जीवनविद्येचा अमृततुषारच आहे,

‘शरीर साक्षात परमेश्वर व सैतान सुद्धा’. शरीराने सैतान व्हायचे की, परमेश्वर व्हायचे हे तुझ्या हातात आहे. आज शरीर सैतान झालेले आहे कारण पैसा हाच देव झालेला आहे. पैशासाठी वाटेल ते करायचे अशी परिस्थिती झालेली आहे. माणसे पैशासाठी सैतानसुद्धा होतात. परमेश्वर की सैतान या दोन्ही गोष्टी ज्ञानानेच ठरतात.

मुळात ज्ञान हाच देव किंवा ज्ञान हाच विठ्ठल असे म्हणतात तेव्हा ज्ञान म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. ज्ञान हे आपल्या ठिकाणी मुळातच असते. आपले स्वरूपच ज्ञान आहे. सत् चित् आनंद म्हणतात तेव्हा त्यात चित् म्हणजे जाणीव. सत् व आनंदाच्यामध्ये चित् असते. चित् म्हणजेच दिव्य ज्ञान, चित् म्हणजेच दिव्य जाणीव एवढे लक्षांत ठेवले, तर चित् म्हणजे दिव्य जाणीव व हेच आपले स्वरूप आहे व ते आज गढूळ झालेले आहे. किती व कसे गढूळ झालेले आहे हे उदाहरण देऊन सांगतो. गंगा नदी किती गढूळ झालेली आहे. हरिद्वारला गेलो, तर गंगेचे पाणी पिऊ नये इतके गढूळ झालेले आहे. पंढरपूरला भीमा नदी व चंद्रभागा यांचे पाणी इतके गढूळ झालेले आहे की, लोक त्यात स्नान कसे करतात हे देवालाच ठाऊक. गंगा असो भीमा वा चंद्रभागा किंबहुना हिंदुस्थानातल्या सर्वच नद्या गढूळ झालेल्या आहेत. कारणे तुम्हाला माहीतच आहेत. कारखान्यांचे दूषित पाणी त्यात सोडले जाते. प्रेते सोडली जातात. नदीत सगळे घाण करतात. त्याचा परिणाम नद्यांचे पाणी गढूळ झालेले आहे. ज्या गंगेत स्नान केले असता आपण पवित्र होणार असे म्हणत होतो त्या गंगेत स्नान करण्याची आता सोय राहिलेली नाही. पाणी तेच पण ते पूर्वी शुद्ध होते व आज ते गढूळ झालेले आहे. अगदी तशीच आपल्या ठिकाणी जी दिव्य जाणीव होती ती दिव्य जाणीव आज गढूळ झालेली आहे. त्यामुळे ते ज्ञान देव राहिलेल नाही, तर ते दैत्य झालेले आहे. म्हणून जीवनविद्येने ही गोष्ट स्पष्ट केली की तुम्ही जे ज्ञान, विज्ञान व अज्ञान म्हणता त्यात ज्ञान हे महत्त्वाचे आहे. यासाठी शुद्ध सुंदर ज्यामुळे लोकांचे भले होईल असे ज्ञान मिळणे व अशा ज्ञानाचा सदुपयोग करणे महत्त्वाचे आहे. या अशा शुद्ध ध्यानाची उपासना केली पाहिजे, कारण जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत जग सुखी होणार नाही. हे करायचे की नाही हे आपणच ठरवायचे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

Comments
Add Comment