ममता यादववर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
वसई : उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे वसईच्या एका शाळेतील मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वसईत शुक्रवारी घडली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर उठाबशा काढण्यास सांगणाऱ्या शिक्षिकेविरोधात अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तिला अटक देखील करण्यात आली आहे.
श्री हनुमत विद्या मंदिर शाळेत इयत्ता सहावीमध्ये काजल (अंशिका) गौड ही वर्षीय मुलगी शिकत होती. ८ नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी शाळेत पोहोचण्यास तिला उशीर झाल्याने उठाबशा काढण्याची शिक्षा तिला दिली होती. मात्र शाळेतून घरी गेल्यानंतर तिची तब्येत खालावली. त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानच शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबईच्या जे जे मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर हा गुन्हा वालिव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता, तर त्याबाबतची तक्रार त्यांनी वालिव पोलीस ठाण्यात नोंदविल्यानंतर पोलिसांनी उठाबशा काढण्यास सांगितलेल्या शिक्षिका ममता यादव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून तिला अटक केल्याची माहिती वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.
काजल ही आधीच अशक्त होती. त्यातच तिला बॅगेचे ओझे खांद्यावर घेऊन १०० उठाबशा काढण्यास सांगितल्या. १०० उठाबशा काढण्याची क्षमता नसल्याची जाणीव असतानाही तिला शिक्षा दिल्याने तिची तब्येत खालावली आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद तिच्या कुटुंबाने पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुलीच्या मृत्यू प्रकरणी तालुका आणि जिल्हा शिक्षण विभागातर्फे याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.






