नवी दिल्ली : दिल्लीतील एका न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख व संस्थापक जवाद अहमद सिद्दिकी यांना १३ दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवले आहे. केंद्रीय तपास संस्थेने दावा केला आहे की, जवाद यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची फसवणूक करून ४१५ कोटी कमावले आहेत. इतकंच नाही तर, त्यांच्या कुटुंबाचे आखाती देशांमध्ये संबंध असल्यामुळे ते पळून जाण्याची देखील शक्यता आहे.
सिद्दिकी व त्यांच्या नियंत्रणाखालील अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टने विद्यार्थी व पालकांना नॅक मान्यता व यूजीसीच्या ओळखपत्रांबद्दल खोटे दावे करून दिशाभूल केली आणि ४१५.१० कोटींची रक्कम गोळा केली. १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर हे विद्यापीठ तपासणीच्या कक्षेत आले. हा हल्ला करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचे अनेक सदस्य अल फलाह विद्यापीठाशी संबंधित होते.
एजन्सीने दावा केला की, ट्रस्टने फसवणुकीच्या मार्गाने फी व शिक्षण शुल्काच्या नावाखाली ४१० कोटींहून अधिक रक्कम गोळा केली व ही रक्कम सिद्दिकी यांच्या वैयक्तिक व खासगी फायद्यासाठी वळवली.






