जेन झी आणि सीपीएन-यूएमएल (कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनायटेड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाल्यामुळे परिस्थिती बिघडली आहे. यूएमएलचे महासचिव शंकर पोखरेल आणि युवा नेते महेश बस्नेत सरकार विरोधात भाषण देण्यासाठी एका कार्यक्रमाला जात होते. ते कार्यक्रमासाठी सेमरा शहरात आल्याची माहिती मिळताच तरुणाई रस्त्यावर आली. जेन झी आणि सीपीएन-यूएमएल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. तणाव वाढला आणि दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. तोडफोड आणि जाळपोळ झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुपारी १ ते रात्री ८ पर्यंत प्रशासनानं संचारबंदी लागू केली. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बुद्ध एअरलाईन्सनं त्यांची देशांतर्गत सर्व उड्डाणं रद्द केली.
सेमरामधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. स्थानिक प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलली आहेत. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ठीक असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.