नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पण ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलील देशमुख यांनी राजीनामा पाठवून दिला आहे. तब्येतीचे कारण देत सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करण्यासाठी पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सलील देशमुख यांनी पत्रातून शरद पवार आणि पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कळवले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन उद्या दुसऱ्या पक्षात जाणार का असा प्रश्न काही पत्रकारांनी विचारताच उद्याची परिस्थिती काय असेल ते माहिती नाही. सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत आहे, असे सलील देशमुख म्हणाले.
सलील देशमुख यांनी काटोल मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे.