Thursday, November 20, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची दमदार सुरुवात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची दमदार सुरुवात
मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली. नियमानुसार अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली. या कालावधीत अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे निवडक जागांवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला. या विजयांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दमदार सुरुवात केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर आणि सावदा या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा नगरसेवक पदाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला. भुसावळ येथे वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या प्रीती मुकेश पाटील, जामनेरमध्ये वार्ड क्र. ११ (ब) मधून भाजपच्या उज्वला दीपक तायडे, सावदा मध्ये वार्ड क्र. ७ (अ) मधून भाजपच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध विजयी झाल्या. एकाच दिवशी तीन नगरसेवकांचा बिनविरोध विजय झाला. जामनेर नगराध्यक्षपदी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन सलग तिसऱ्यांदा बिनविरोध जामनेरच्या नगराध्यक्ष झाल्या आहेत. साधना महाजन यांनी जामनेरच्या नगराध्यक्षपदावर बिनविरोध विजयाची हॅटट्रिक केली.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवकपदाचे उमेदवार होते. आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह नऊ उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. या घडामोडीनंतर आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांनी माघार घेणे पसंत केले. हा दूरदृष्टीचा विजय आहे, असे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे १७ उमेदवार आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. भाजपने निवडणुकीआधीच विजय मिळवला.
Comments
Add Comment