Thursday, November 20, 2025

नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात बस थेट फलाटावर धडकली अन्... ९ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी

नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात बस थेट फलाटावर धडकली अन्... ९ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी

नाशिक : नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात घडलेल्या भीषण अपघातात एका ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. १८ तारखेला बुधवारी दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला असून, स्थानकात प्रवेश करताना बसचा ब्रेक अचानक निकामी झाला आणि नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाटावर चढली. या धडकेत फलाटावर उभ्या असलेल्या नागरिकांना स्वतःचा बचाव करता न आल्याने मोठी दुर्घटना घडली.

मृत मुलाचे नाव आदर्श बोराडे असून, तो आपल्या कुटुंबासोबत देवदर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी त्याचे कुटुंब सिन्नर बस स्थानकात बसची वाट पाहत उभे होते. मात्र अचानक बस फलाटावर धडकली आणि या धडकेत आदर्शचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या इतर प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत स्थानकाबाहेर रास्ता रोको केला. त्यांनी वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि बसच्या तांत्रिक तपासणीतील त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment