सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही शिवसेना-भाजपने आम्हाला डावलले - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांचा थेट आरोप
संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याची तयारी असतानाही स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाने गोंधळ घालून राष्ट्रवादी काँग्रेसला पद्धतशीरपणे डावलले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे संगमनेरमधील शिवसेना आणि भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा द्यायच्या, याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या आणि जागा देण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर येथील स्थानिक शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी जागा देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले नाही. डॉ. विखे पाटील यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने शब्द दिला असतानाही स्थानिक शिवसेना आणि भाजपने आम्हाला डावलले असून शिवसेना व भाजपा उमेदवारांचे अर्ज भरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आला नाही असे थेट आरोप कपिल पवार यांनी केले आहेत.
महायुतीच्या बैठकीत ठरलेल्या गोष्टींना येथील शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही, असा पवित्रा घेत, आम्हाला आमच्या पक्षाचे अस्तित्व आहे त्यामुळे आम्हाला लढायचं आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या जागा ताकदीने स्वबळावर लढवणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरल्याने महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या विजयाच्या समीकरणांवर थेट परिणाम करेल.
एकंदरीत, राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांना आता स्वबळावर उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी सेवा समितीच्या उमेदवारांना मतदान करायला लावले आणि जर निवडणुकीनंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, तर आम्ही कोणाकडे जायचे ? असा प्रश्न एक विशिष्ट समाज दबक्या आवाजात करत असल्याने या चर्चेमुळे संगमनेरच्या राजकारणात एक प्रकारे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.