शॉर्टसर्कीटमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित
कोट्यवधीचा अर्थसंकल्प, पण महापालिका मुख्यालयात लिफ्टच्या विजेची बॅकअप यंत्रणेचा अभाव
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिका मुख्यालयात तब्बल १५ ते २० मिनिटे बत्ती गुल झाली असून वीज पुरवठा खंडित झाल्याने मुख्यालय इमारतीतील विस्तारीत इमारतीतील प्रवेशद्वार क्रमांक सात येथील उदवाहनात (लिफ्ट) पाच ते सहा जण अडकले होते. लिफ्टचे चालक आणि महापालिका सुरक्षा अधिकारी व जवानांनी तातडीने चावीद्वारे लिफ्टचे दरवाजे उघडून सर्वांची सुटका केली. विशेष म्हणजे लिफ्टकरता स्वतंत्र वीजेचा पुरवठा करण्यासाठी इर्न्व्हटरच्या माध्यमातून बॅकअप सेवा असणे आवश्यक आहे. परंतु, सुमारे ७५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेला आपल्या मुख्यालयातील इमारतीत लिफ्टकरता बॅकअप यंत्रणा बसवता येत नाही.त्यामुळे अशाप्रकारे लिफ्टमध्ये अडकून कुणाचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई इमारत मुख्यालयाच्या विस्तारीत इमारतीत दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर हा पुरवठा ४ वाजून १२ मिनिटांनी सुरळीत झाला. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्याने लिफ्टमध्ये काही जण अडकले गेले. त्यामुळे सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि जवानांनी लिफ्ट चालकांसह सर्व मजल्यांवर जावून अडकलेल्यांचा शोध घेतला. त्यावेळी प्रवेशद्वार क्रमांक ७ येथील लिफ्टमध्ये तळ मजला आणि पहिला मजला या दरम्यान लिफ्ट अडकली गेली होती. त्यामुळे सात ते आठ मिनिटांमध्ये लिफ्टचा दरवाजा उघडण्यात यश आले. यामध्ये चार ते पाच जण अडकले होते आणि त्यात ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश होता . जे हयातीचा दाखला देण्यासाठी तथा त्याचा अर्ज घेण्यासाठी महापालिकेत आले होते. हे ज्येष्ठ नागरिक महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक होते. त्यानंतर बाहेर काढल्यानंतर सर्व लिफ्टची तपासणी करून झाल्यानंतर सव्वा चार वाजात वीज पुरवठा सुरळीत झाला.
महापालिका मुख्यालयातील विस्तारीत इमारतीच्या तळघरात असलेल्या वीज सबस्टेशनमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे हा विजेचा पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी हा पुरवठा सुरळीत केला असला तरी मुंबईतील अनेक इमारतींमध्ये लिफ्टकरता पर्यायी विजेचा पुरवठा करण्यासाठी बॅकअप यंत्रणा बसवली जाते, किंवा अचानक लिफ्ट बंद झाल्यास लिफ्ट मजल्यावर येवून थांबते अशाप्रकारची कोणतीही यंत्रणा नसल्याने जर वेळीच अडकलेल्यांना बाहेर न काढल्यास तथा विलंब झाल्यास कुणाच्या जीवावर बेतू शकते.
आमदार प्रसाद लाड यांची अंधारात चढले मजले
भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड हे काही कारणास्तव महापालिका मुख्यालयातआले होते. पण त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांना अंधारात चालतच दोन मजले चढत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यालयात जावे लागले. याच दरम्यान अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना बाहेर जायचे होते. परंतु, वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांना कार्यालयातच थांबावे लागले. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाच मिनिटांनी त्या लिफ्टमधून खाली उतरल्या






